मुंबई : राज्यात गेल्या सात दिवसांत ‘कोविड-१९’ च्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत सहा पटीने वाढ झाली आहे. २३ डिसेंबरपर्यंत १०३ सक्रिय रुग्ण होते, ती संख्या ३० डिसेंबरला ६२० झाली आहे. त्यातील २२ टक्के रुग्ण मुंबईत आहेत. कोविड चाचण्या आणि पाळत ठेवण्याच्या वाढीमुळे प्रकरणे वाढली आहेत. विशिष्ट ऋतुमध्ये अनेक श्वसन विषाणूंचा प्रादुर्भाव होणे ही स्थिती असामान्य नाही. ‘इन्फ्लुएन्झा’ श्वासोच्छ्रुसाच्या आजारांना कारणीभूत ठरला आहे.
विशेषत: फ्ल्यूच्या हंगामात याचे प्रमाण अधिक आहे, असे राज्याच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ आरोग्य अधिका-याने सांगितले. दरम्यान, सलग तिस-या दिवशी दिवसभरात १३१ रुग्णांची नोंद : राज्यात रविवारी (ता. ३१) १२,०४५ जणांची चाचणी करण्यात आली. त्यांपैकी १३१ जणांमध्ये कोविडचे निदान झाले.
नवी मुंबईत सर्वाधिक १८ नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर ठाणे महापालिकेत १५, मुंबईत १४, रायगडमध्ये ४, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली महापालिका आणि उल्हासनगरमध्ये प्रत्येकी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६९३ वर पोहोचली आहे. त्यापैकी ठाण्यात सर्वाधिक १९० सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर मुंबईत १३७, पुण्यात १२६, रायगडमध्ये २७ आणि उर्वरित इतर जिल्ह्यांमध्ये आहेत.