नवी दिल्ली/मुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध होतांना पाहायला मिळत आहे. देशभरात सोमवारी सकाळपासून ठिकठिकाणी ट्रकचालक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. हिट अँड रन कायद्यांतर्गत शिक्षेचा कालावधी वाढविण्यास देशभरातील ट्रकचालकांनी विरोध दर्शविला केला. वास्तविक, नवीन कायद्यानुसार, वाहनचालक पळून गेल्यास आणि प्राणघातक अपघाताची तक्रार न केल्यास १० वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. या कायद्याला देशभरात विरोध होत असून ट्रकचालक थेट रस्त्यावर उतरले आहेत.
यापूर्वी, आयपीसी कलम ३०४ए (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. शिक्षेच्या कालावधीत वाढ केल्यामुळे सोमवारी देशभरातील ट्रकचालकांनी विविध भागात आंदोलन केले. हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातील ट्रकचालकांनी संप पुकारला आहे. दरम्यान, या कायद्यविरोधात आता ऑटोचालकांनीही नवी आघाडी उघडली आहे. राजेंद्र कपूर, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष (दिल्ली गुड्स ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशन), रस्ते अपघातांवरील नवीन कायद्याबद्दल बोलताना म्हणाले की, हा तुघलकी हुकूम आहे. ट्रान्सपोर्ट असोसिएशनची सूचना विचारात घेण्यात आली नाही.
ते म्हणाले की, यात नेहमी मोठ्या वाहनाच्या चालकाची चूक मानली जाते आणि रस्त्यावर अपघात झाल्यानंतर ट्रक आणि बस चालकांना मारहाणही केली जाते, आता अशा परिस्थितीत चालक आपलाच जीव वाचवण्याचा प्रयत्न करणार. ऑल इंडिया मोटर अँड गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सर्व प्रमुख अधिकारी २ जानेवारी २०२४ रोजी आभासी बैठक घेणार आहेत. सरकारने हेल्पलाइन क्रमांक जारी केल्यास, रस्ता अपघात झाल्यानंतर चालक किंवा त्याच्या मालकाने अपघाताची माहिती दिली तर त्यांना हा कायदा लागू होऊ नये.
एवढी रक्कम चालकाकडे कुठून येणार?
या नवीन कायद्याच्या निषेधार्थ ट्रक चालक अनेक राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, सर्व चालक आपली नोकरी सोडत आहेत, कारण ते म्हणतात की आपण मजूर म्हणून काम केले तर बरे होईल. १० वर्षांची शिक्षा आणि ७ लाख रुपये भरावे लागतील, आता एवढी रक्कम एका सामान्य चालकाकडे कुठून येणार?
राज्यभरातील ट्रकचालक रस्त्यावर
राज्यभरातील ट्रकचालक रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांनी चक्काजाम आंदोलन केले. गोंदियात टायर जाळून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर येथे ट्रकचालक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच हा नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे.