पुणे : शहरातील कल्याणीनगर परिसरात मध्यरात्री २ वाजता झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांची जीव गेला. मद्यधुंद नशेत असलेल्या आरोपी वेदांत अगरवाल चालवत असलेल्या भरधाव कारने धडक दिल्याने एका तरुण व तरुणीचा मृत्यू झाला. मात्र, १५ तासांतच वेंदातना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपी वेदांत अगरवालला आज न्यायाधीश धनवडे यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. त्यावेळी वेदातंचे वकील प्रशांत पाटील यांनी घडलेली घटना दुर्दैवी असली तरी जे कलम लावण्यात आले आहे,
त्यामध्ये जामीन मिळण्याची तरतूद असल्याच कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने ही बाब मान्य करुन वेदांत अगरवालाला जामीन मंजूर केला. मात्र, काही प्रमुख अटी व शर्तींसह न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार, वेंदातला १५ दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत चौकात काम करावे लागणार आहे.
अपघातातील आरोपी वेदांतला आज न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी फिर्यादीच्या बाजुने भूमिका मांडता वेदांतच्या जामीनला विरोध केला होता. विशेष म्हणजे वेदांत दारू पिल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी पोलिसांनी या बाबातचा रिपोर्ट अद्याप आला नसल्याचे कारण देत तो दारु पिल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली नाही. मात्र, आरोपीविरुद्ध लावण्यात आलेल्या कलमातील तरतुदीनुसार वेदांत जामीन पात्र असल्याने त्यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. बेदरकारपणे कार चालवून दोघांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या वेदांत अगरवालला जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातलेल्या अटी अतिशय आश्चर्यचकारक आहेत. न्यायालयाने पुढील अटींवर वेदांत अगरवालला जामीन मंजूर केला आहे. त्यामध्ये, पहिलीच अट ट्रॅफिक पोलिसांसोबत चौकात उभे राहून १५ दिवस वाहतुकीचे नियोजन करण्याचे सांगण्यात आले आहे.
न्यायालयाने लावलेल्या अटी व शर्ती
१. वेदांत अगरवालला पंधरा दिवस ट्रॅफिक कॉन्सटेबल सोबत चौकात उभे वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.
२. वेदांत अगरवालला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागणार आहेत.
३. वेदांत अगरवालला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल.
आरोपीविरुद्ध ३०४ अंतर्गत गुन्हा
वेदांत अग्रवालवर आयपीसी ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, अर्थात निष्काळजीपणाने इतरांच्या मृत्युला कारणीभूत होणे या अनुषंगाने ३०४ दाखल करण्यात आले आहे. प्रथमदर्शनी आरोपी हा दारु पीला होता असा पोलिसांना संशय होता. त्यासाठी त्याच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. मात्र, या चाचणीचा रिपोर्ट येण्याआधीच न्यायालयाने वेदांतला जामीन मंजुर केलाय. न्यायालयाला वेदांतने केलेला गुन्हा गंभीर वाटला नाही, त्यामुळेच वेदांतला जामीन मिळाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.