लातूर : विनोद उगीले
गारपीट बेमोसमी पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज पडून मागच्या तीन वर्षात वीज २४ जणांचा तर २१० जणावरांचा बळी गेला आहे. यामागचे मुख्य कारण हे प्रशासनाची उदासिनता व त्यांनी लावलेले निकामी वीजरोधक यंत्रे ठरत असल्याचे दिसून येते. जिल्ह्याची मदार ही फकत ३ विजरोधक यंत्रावर असून जवळपास २०० विजरोधक यंत्र उभारणीची प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून शासनदरबारी पडून आहेत यावरून सर्व सामान्याची शासनाला व प्रशासकीय यंत्रणेला किती काळजी आहे यावरून दिसून येते.
जिल्ह्यातील प्रत्येक मंडळातील किमान हजार लोकवस्तीच्या गावात तरी वीज रोधक यंत्रे बसवण्यात यावीत, अशी मागणी वारंवार होत असताना प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कारवाई अद्याप झालेली दिसत नाही. लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातील वडवळ व औसा तालुक्यातील बुधोडा व खरोसा येथे दशकभरापुर्वी वीज रोधक यंत्र बसवण्यात आली आहेत. याच तीन यंववर जिल्ह्याची मदार आहे. मागच्या तीन वर्षात जिल्ह्यात सन २०२२ साली १० व्यक्तींचा तर ४३ जणावरांचा, २०२३ साली ५ व्यक्तींचा तर १०४ जणावरांचा व चालू वर्षात ९ व्यक्तींचा तर ६३ जणावरांचा असा एकूण २४ व्यक्तींचा व २१० जणावरांचा वीज पडून बळी गेला आहे.
वीज रोधक यंत्र उभारणी संदर्भाची जवळपास २०० प्रस्ताव शासन दरबारी पडून आहेत परंतु इतर मागण्यांप्रमाणेच यांना ही सरकार दरबारी वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या आहेत. जिल्ह्यात वादळी पाऊस अवकाळी पावसाच्या दरम्यान वीज पडून जीवितहानी होण्याच्या घटना वाढ होत असताना शासन व प्रशासकिय यंत्रणा गांर्भीयांने घेत नाही ते अजून किती बळीची वाट पहात आहेत असा सवाल ही उपस्थित केला जात आहे. विजेचा धोका बळावत चालला आहे. वीज रोधक यंत्रे जास्तीत जास्त ठिकाणी बसवली, तर वीजेपासून होणारा धोका टाळला जाऊ शकतो. मात्र, तसे होताना दिसत नाही. वीज पडून मृत पावलेल्या अनेक शेतक-यांच्या घरी प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी भेटी देऊन सांत्वन करतात. मात्र, या घटना टाळण्यासाठी सरकारी धोरण असतानाही प्रत्येक सज्जावर वीज रोधक यंत्र बसवण्यास कोणीही फारसे प्रयत्न करताना दिसत नसल्याची शोकांतिका आहे.