27.9 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeलातूरलातूर, धाराशिवमध्ये जोर‘धार’

लातूर, धाराशिवमध्ये जोर‘धार’

- नांदेड, परभणीत शिडकावा, दिवसभर उन्हाची तीव्रता

लातूर/धाराशिव : प्रतिनिधी
मराठवाड्यात पावसाचा धडाका सुरू असून, गुरुवारी सायंकाळी लातूर, धाराशिवमध्ये आकाशात ढग दाटून आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी सायंकाळी पावसाचा शिडकावा झाला. मात्र, आकाशात ढग दाटून आल्याने रात्री उशिरापर्यंत पाऊस पडू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली.

मागच्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कुठे ना कुठे पाऊस पडत असल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहात असून, शेतशिवारासह पाझर तलावात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शेतात वापसा नसल्याने पेरणीही खोळंबली आहे. दरम्यान, शेतक-यांची बी-बियाणे, खत खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र, रोजच पावसाचा धडाका सुरू असल्याने पेरणी खोळंबली असून, आता शेतक-यांना पाऊस थांबण्याची प्रतीक्षा आहे. कारण पाऊस थांबल्याशिवाय पेरण्याच होत नाहीत. मात्र, यंदा वेळेत पाऊस झाल्याने पेरण्याही वेळेत होणार आहेत. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

लातूर, धाराशिव जिल्ह्यात दिवसभर कडक ऊन होते. तसेच तापमानही अधिक होते. त्यामुळे सायंकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यातच दुपारी साडेचारच्या सुमारास लातूर परिसरात आकाशात ढग दाटून आले होते. त्यातल्या त्यात लातूर शहराचा उत्तर भाग आणि रेणापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालेले असतानाच सायंकाळी लातूर जिल्ह्यात ब-याच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरूच होता. त्यामुळे रस्ते, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले होते. तसेच मांजरा नदीतही पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच बीड, जालना, छ. संभाजीनगरमधील ब-याच भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळी भागाला पावसाळ््याच्या सुरुवातीलाच दिलासा मिळाला आहे.

राज्यातही अनेक ठिकाणी हजेरी
कोकण, उत्तर महाराष्ट्रासह इतर भागांतही पावसाने हजेरी लावली. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर ब-याच भागांत संततधार सुरू आहे. पुणे जिल्ह्यातही ब-याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली. बारामती तालुक्यातील कन्हेरी गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह ब-याच भागात आज जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR