30.4 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रचौथीपर्यंतच्या शाळा आता ९ नंतर भरणार

चौथीपर्यंतच्या शाळा आता ९ नंतर भरणार

लहान मुलांची झोपमोड थांबणार

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ वाजेनंतर भरणार आहेत. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण यांनी बुधवारी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना तशा सूचना दिल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी लगेचच करण्यास बजावण्यात आले आहे. परिणामी, लहान मुलांची सकाळी होणारी झोपमोड थांबणार आहे.

दरम्यान, राज्यातील बहुतेक शाळा सकाळी सात किंवा आठ वाजता भरतात. शाळेच्या वेळेआधी मुलांना एक ते दोन तास आधी तयारी करावी लागते. परिणामी लहान मुलांना सकाळी ६ वाजेपूर्वी उठावे लागत असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. काही महिन्यांपूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी लहान मुलांच्या झोपमोडीचा मुद्दा उपस्थित करून आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाला केली होती. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजता किंवा ९ वाजेनंतर भरविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आतापर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता १५ जूनपासून लहान मुलांची झोपमोड थांबणार आहे.

शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. आताही बहुतेक शाळा सकाळी ९ वाजेपूर्वीच भरत आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण यांनी बुधवारी याबाबत सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना शाळा भरविण्याच्या वेळेबाबत सूचना जारी केल्या आहेत. यात यापुढे पूर्व प्राथमिक म्हणजे बालवाडी ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजेच्या आधी भरवता येणार नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

जीवनशैलीत बदल झाल्याने निर्णय
आधुनिक युगातील बदललेली जीवनशैली, मनोरंजनाची विविध साधने, शहरांमध्ये उशिरापर्यंत सुरू असलेले ध्वनिप्रदूषण आदी कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिरा झोपत आहेत. शाळा सकाळी लवकर असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसावलेले असतात. अभ्यासासाठीचा उत्साह कमी होतो. त्याचा नकारात्मक परिणाम अध्ययनावर होतो. तसेच हिवाळा व पावसाळा या ऋतूंमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाण्यास त्रास होतो. बहुतेक वेळा थंडी आणि पावसामुळे मुले आजारी पडतात, या सर्व बाबी निदर्शनास आल्याने शासनाने शाळांच्या वेळेतील बदलाचा निर्णय घेतला.

जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक शाळांना सूचना
जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरविण्याची वेळ सकाळी ९ वाजता वा अगोदरची आहे, त्या शाळांनी शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ पासून पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरविण्याबाबतची वेळ सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर ठेवावी.
शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन व अध्यापनाचा निश्चित केलेला कालावधी कमी होणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी.

ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळेची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल तर त्यांनी या कार्यालयास आपल्या अडचणींसह प्रस्ताव दाखल करावा. शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजेपूर्वी भरविण्यात येऊ नयेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR