पुणे : ग्रामविकास खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी श्री. माधवराव यशवंतराव सुतार यांना १८ जून रोजी रात्री देवाज्ञा झाली. ते ९० वर्षांचे होते. अभियंते दीपक आणि वरिष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार यांचे ते वडिल होत.
अध्यात्म आणि इतिहास यांचा व्यासंग असलेल्या माधवराव सुतार यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना १५ जून रोजी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १८ जून रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांचे निधन झाले. वयाच्या नव्वद वर्षांत त्यांना पहिल्यांदा रुग्णालयात दाखल करावे लागले. ते शेवटपर्यंत सक्रिय आयुष जगले. त्यांच्या पार्थिवावर मूळगावी लासोना (जि. धाराशिव) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मोठे बंधू वसंतराव (९४ वर्षे), पाच मुले, सुना, नातवंडे यांचा मोठा परिवार आहे. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या भाषांवर प्रभुत्व होते, तसेच मोडी भाषेचाही त्यांचा अभ्यास होता.
माधवराव सुतार यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ (हैदराबाद) येथे झाले. त्यांनी सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र सरकारमध्ये एकाच वेळी तीन पदांवर सेवा बजावली. त्याकाळी सरकारी नोकरी करण्यास कोणी तयार नव्हते. नंतर सरकारी सेवेचे आकर्षण वाढल्याने, सरकारी नोकऱ्यांमध्ये लोक रूजू होऊ लागले. त्यामुळे श्री. सुतार यांच्यासमोर तीनपैकी एक सेवा निवडण्याचा पर्याय देण्यात आला. त्यांनी ग्रामविकास अधिकारी हे पद ठेवले आणि अन्य दोन पदांचा राजीनामा दिला.
निधनाच्या पंधरा दिवस आधीच, त्यांनी देहू, आळंदी तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन संतश्रेष्ठांचे दर्शन घेतले होते. देहूमध्ये जगद्गुरू तुकोबारायांच्या सदेह वैकुंठगमन या तैलचित्रासमोर त्यांनी स्वत:चे छायाचित्रही काढून घेतले होते. त्यांच्या रुपाने जुन्या काळातील एक जाणते व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.