हदगाव : प्रतिनिधी
सतत तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे बोरगाव मार्ग जाणा-या हस्तरा बोरगाव ओढ्याला पूर आला. पुराचे पाणी पुलावरून वाहत असतांना स्टंटबाजी करीत दुचाकीस्वार तरूणाने पुलाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. पुलाच्या मध्यभागी गेल्यानंतर तरूणाचे धाडस अंगलट आले आणि पाण्याचा वेग वाढताच दुचाकी वाहून गेली. मात्र सुदैवाने तरूणाचा जीव वाचला. ही थरारक घटना २७ जुलै रोजी घडली.
कळमनुरी तालुक्यातील कवडी येथील तरूण गजानन बनसोडे वय २२ हा २७ जुलै रोजी हदगाववरून बोरगाव मार्ग बाळापुरकडे जात होता. मात्र सतत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बोरगावच्या ओढ्याला पूर आला होता. पुराचे पाणी पुलावरून वाहत असतांना स्टंटबाजी करीत गजाननने पुरातून दुचाकी पुढे नेली. त्यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते गजानन सोळंके पाटील यांनी त्याला पुराचे पाणी खूप आहे, मध्ये जाऊ नका परत या. पुराचा वेग खूप आहे वाहून जाशील अशी विनंती केली. तरी सुद्धा तो काहीच न ऐकता पुलाच्या मध्यभागी गेला. त्यावेळी पुराचा वेग वाढल्याने दुचाकी खाली पडली. तेव्हा सुद्धा सोळंके यांनी त्यांना विनंती केली. दुचाकी गेली तर जाऊ द्या परंतु तुम्ही परत या मी तुमची उद्या दुचाकी काढून देतो म्हणाले.
तेव्हा गजानन कसाबसा परत आला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. गजानन सोळंके यांनी जीवाचा आटापीटा करीत एका तरूणाचा जीव वाचवल्यामुळे त्यांचे तालुक्यांमध्ये कौतुक होत आहे. दि. २८ रोजी सकाळी बोरगाव येथील गावक-यांनी तरूणाची दुचाकी पुराच्या बाहेर काढून देत सुखरूप घरी पाठविण्यात आले. मागील आठवडा भरापासून पाऊस सक्रीय झाला आहे. यात पाच दिवसांपासून विविध भागात सतंतधार सुरु आहे. यामुळे नदी नाल्यांना पुर आला आहे. या पुरातून तसेच पुलावरुन पाणी वाहत असतांना नागरीक पुल ओलांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून जिवीत हानी होत आहे. पुर आलेले नदी नाले जिव धोक्यात घालून ओलांडूनये जिल्हाप्रशासनाने केले
आहे.