पॅरिस : वृत्तसंस्था
पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक मिळाले आहे. आज ऑलिम्पिक स्पर्धेचा चौथा दिवस आहे. भारताला दुसरे कांस्य पदकही नेमबाजीत मिळाले आहे.
दरम्यान, मनु भाकरने इतिहास रचत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरे पदक मिळवून दिले आहे. हे पदक १० मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरीत मिळाले आहे. मनु भाकर आणि सरबज्योत सिंग जोडीला हे कांस्य पदक मिळाले असून एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत २ पदके मिळवणारी मनु पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला पदक मिळवून देणारी मनु भाकर पहिली भारतीय ठरली होती.
मनु भाकरने याआधी २८ जुलैला पॅरिस ऑलिम्पिकच्या १० मीटर एअर पिस्टल सिंगल्स इवेंटमध्ये ब्रॉन्झ मेडलवर नेम साधला होता. पॅरिसमध्ये मिळालेल्या पहिल्या यशानंतर ४८ तासानंतर मनु भाकरने आणखी एक कांस्य जिंकून इतिहास रचला आहे.
कोरियाने पहिला सेट जिंकला
ब्रॉन्झ मेडल मॅचमध्ये कोरियाई जोडीसोबत मनु आणि सरबज्योतचा सामना सोपा नव्हता. या मॅचच्या सुरुवातीला कोरियाने पहिला सेट जिंकला. त्यानंतर सलग ५ सेट मनु आणि सरबज्योतने जिंकले. कोरियाने पुन्हा मॅचमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण मनु आणि सरबज्योतच्या एकाग्रतेने त्यांना यशस्वी होऊ दिले नाही. अखेर मेडल भारताने जिंकले.