वायनाड : केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांचा आज अपघात झाला. वीणा जॉर्ज या वायनाडला जात असताना त्यांच्या कारचा मलप्पूरममधील मंचेरी येथे अपघात झाला. या अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्या असून, त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मंचेरी मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले आहे.
आरोग्यमंत्री वीणा वायनाडमधील भूस्खलनात प्राण गमावलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आज वायनाडला जात होत्या. राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले की, वीणा जॉर्ज यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत १५८ जणांचा मृत्यू
दरम्यान, वायनाड जिल्ह्यात झालेल्या विविध भूस्खलनाच्या घटनांमध्ये ३०० हून अधिक घरांचे नुकसान झाले असून २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर १५८ जणांचा मृत्यू झाला असून, बचाव कर्मचारी ढिगा-याखाली दबलेल्या लोकांना शोधण्यात व्यस्त आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती आज केरळच्या महसूल विभागाने दिली आहे.