17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रगिरणा नदीत अडकलेल्या १२ जणांची सुटका

गिरणा नदीत अडकलेल्या १२ जणांची सुटका

नाशिक : राज्यभरात पावसाचे थैमान सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरणांच्या पाण्याची पातळी देखील वाढली आहे. त्यातच मालेगाव येथील गिरणा नदीला देखील पूर आला आहे.

या नदीवर काल मासेमारी करण्यासाठी गेलेले १२ जण पुराच्या पाण्यात अडकले. या सर्वजणांनी उंच खडकाचा आधार घेतल्यामुळे ते सुखरूप राहिले. एक रात्र त्यांनी या खडकावरच काढली. ते अडकून तब्बल १५ तासांहून अधिक काळ लोटल्यानंतर अखेर आता त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.

तब्बल १५ तासांहून अधिक कालावधी उलटूनही १२ जणांना अद्याप नदीपात्रातून सुखरूप बाहेर काढता आलेले नव्हते. मनपा प्रशासन, अग्निशमन दल, एसडीआरएफ जवानांनी या १२ जणांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तरुणांना बाहेर काढण्यास अडथळा निर्माण होत होता. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

अडकलेल्या तरुणांना जेवण पोहोचवण्यात आले. दरम्यान, अशा आपत्कालीन परिस्थितीत आता हेलिकॉप्टरची मदत घेऊन १२ जणांना बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिली होती. नुकतीच या १२ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान, या तरुणांना वाचविण्यासाठी धुळे येथून एसडीआरएफची टीम रात्री घटनास्थळी दाखल झाली. मात्र रात्री अंधारामुळे बचावकार्य थांबविण्यात आले होते. सकाळी अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यास सुरुवात करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR