लातूर : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मतदारांचा विश्वास प्राप्त करीत भरघोष यश मिळवले. मराठवाड्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. महाराष्ट्रातील भाजपा महायुतीचे सरकार हे ६० टक्के कमिशन घेणारे सरकार आ.हे. शेतकरी, शेतमजूर, दलित, अल्पसंख्याक, बेरोजगार युवक, महिलांचे प्रश्न या सरकारने सोडवले नाहीत. उलट भ्रष्टाचाराने महाराष्ट्र पोखरुन काढला. त्यामुळे महाराष्ट्रात आता परिवर्तनाची लाट आली असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या विधानभवनावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या अनुषंगाने पक्षाच्या वतीने विभागवार आढावा बैठका घेऊन २० ऑगस्ट रोजी मुंबई येथे विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यातील पहिली विभागीय आढावा बैठक दि. १० ऑगस्ट रोजी लातूर येथे झाली. बैठकीदरम्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर लातूर, धाराशिव, बीड या तीन जिल्ह्यांच्या विजय संकल्प मेळाव्यात काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख होते.
या मेळाव्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस पक्षाचे विधान परिषद गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार अॅड. त्र्यंबक भिसे, युवक काँग्रेसचे कुणाल राऊत, नानाभाऊ गावंडे, डॉ. वजाहत मिर्झा, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर अॅड. दीपक सूळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात लातूरचे नूतन खासदार डॉ. शिवाजी काळगे, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण, जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक न्यायाला प्राधान्य दिले, असे नमूद करून रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, लोकसभेच्या यशाची प्रेरणा घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरावे. राज्यातील काँग्रेसमध्ये कसलेही मतभेद नाहीत. आम्ही सर्वजण एकदिलाने काम करीत आहोत. या उलट सत्ताधा-यांमध्ये कुरघोडी सुरु आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांनी दिलेला विकासाचा मंत्र घेऊन जनतेपर्यंत जा. काँग्रेस पक्षाचा विचार घराघरापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी केले.
फोडा व राज्य करा ही भाजपची निती : नाना पटोले
यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारवर भाजपा व आरएसएसचा कंट्रोल आहे, एकनाथ शिंदे हे केवळ मुखवटा आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाल उधळला पण त्यांनी हा गुलाल का उधळला हे जाहीर केले नाही. जरांगे पाटील व त्यांच्यात काय बोलणी झाली हे आम्हाला माहित नाही. सर्व पाप सरकारने करायचे आणि खापर विरोधी पक्षावर फोडायचे, हा त्यांचा अजेंडा आहे. राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार असताना आरक्षण देण्यापासून त्यांना कोणी थांबवले, असा प्रश्न विचारून त्यांना आरक्षण द्यायचे नाही तर दोन्ही समाजात भाडंणे लावायची आहेत. फोडा व राज्य करा या ब्रिटीश नितीचा वापर भाजपा करत आहे. मनुवादी व्यवस्था हवी की शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार हवा, याचा विचार जनतेने करावा. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीने एक जागा जिंकली. आता विधानसभा निवडणुकीत महायुतीचा सुपडासाफ करा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.
‘मविआ’च्या जागा वाटपात लातूर जिल्ह्याला अधिकाधिक जागा मिळाव्यात
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जेव्हा जागा वाटप होतील तेव्हा जागा वाटपात लातूर जिल्ह्याला अधिकाधिक जागा मिळाव्यात, असे नमुद करुन यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले, उदगीरची जागा राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहेत. परंतू, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जाळे काँग्रेस पक्षाचे आहे. त्यामुळे उदगीरची जागा काँग्रेस पक्षाला सोडवून घ्यावी. पक्षाच्या श्रेष्ठींनी कार्यकर्त्यांचे पालकत्व स्वीकारुन कार्यकर्त्याना न्याय द्यावा. लोकसभेत महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला मिळालेले यश सुवर्ण अक्षरात लिहावे, असे आहे. काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, खासदार राहूल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, रमेश चेन्नीथला, नानाभाऊ पटोले, बाळासाहेब थोरात या सर्व नेत्यांमुळे यश मिळवला आले. सत्ताधा-यांनी महाराष्ट्रातील घरे फोडण्याचे काम केले. मराठवाड्यातही तेच केले. सत्ताधा-यांची नियत फिरली आणि त्यांनी ‘देवघर’ही फोडले. परंतू, देवघरातला ‘देव’ आपल्यासोबत आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकुरकर यांना अग्रहाची विनंत केली पण त्यांनी काही अडचणी बोलून दाखवल्या. खरे तर विलासराव देशमुख यांना शिवराज पाटील चाकुरकर यांनीच राजकारणत आणले. शंकरराव चव्हाणांनी विलासराव देशमुख यांना मोठे केले. काँग्रेसची परंपरा, काँग्रेसची संस्कृती जोपासण्याचे काम लातूरच्या काँग्रेस जणांनी केले. त्यांना सलाम. राज्यात महायुतीकडून लुट सुरु आहे. ६० टक्क्यांचे सरकार आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त काँग्रेसच्याच नेतृत्वाखाली होऊ शकतो. महाराष्ट्राच्या विधानभवनावर तिरंगा फडकविण्याकरीता सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘मविआ’चा मुख्यमंत्र्याचा चेहरा सामान्य माणुस
यावेळी बोलताना आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्याचा चेहरा हा समान्य माणुस असल्याचे नमुद करुन महाविकास आघाडीकडून मराठवाड्याच्या खुप अपेक्षा आहेत आणि तो त्यांचा अधिकारही आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मराठवाड्याच्या मागसलेपणाचा लेबल पूसून टाकण्यासाठी खुप कार्य केले. सिंचन, दळणवळ, उद्योग, कृषी, शिक्षण, आरोग्य या क्षेत्राच्या विकासासाठी नेत्यांनी परिश्रम घेतले. विलासराव देशमुख यांनी अडचण अंगावर घेऊन त्यातून मार्ग काढले. त्यांनी मांजरा, रेणा आदी नद्यांवर बराजची शृंखला उभी केली. आज धरणांपेक्षा अधिक पाणीसाठा बराजमध्ये आहे. महात्मा गांधी यांनी देश लुटणा-या ब्रिटीशांना चले जाओचा नारा दिला होता. ब्रिटीश गेले. परंतू, आजही देश लुटला जात आहे. त्यामुळे आता ‘बापू लढेथे गोरोंसे, हम लढेंगे चोरोंसे’, असा नारा आमदार धिरज देशमुख यांनी दिला. प्रारंभी शंखनाद करुन कार्यक्र्रमाची सुरुवात झाली. पाहूण्यांचे स्वागत माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख, श्रीशैल उटगे, अॅड. किरण जाधव, अशोक पाटील निलंगेकर, अभय साळूुंके, गोरोबा लोखंडे, शीलाताई पाटील, स्मिता खानापूरे, अॅड. प्रमोद जाधव, कल्याण पाटील, सिराज जहागीरदार, अॅड. फारुक शेख, दीपक सुळ, एकनाथ पाटील, अनिल चव्हाण, अकबर माडजे, इम्रान सय्यद, प्रविण कांबळे, प्रविण बिरादार यांनी केलीे. कार्यक्रमास विद्या पाटील, अमर खानापूरे, संभाजी सुळ, प्रिती भोसले, उषा कांबळे, बाबासाहेब गायकवाड, दीपक राठोड आदीसह काँगेस पक्षाचे लातूर, धाराशीव, बीड येथील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन सुपर्ण जगताप, व्यंकटेश पुरी, प्रविण सूर्यवंशी यांनी केले. श्रीशैल उटगे यांनी आभार मानले.
अध्यक्षीय समारोप करताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, नुकतीच झालेली लोकसभा निवडणुक वार ऑफ जस्टीस होती. त्यात इंडिया आघाडीला यश मिळाले पण सत्तेपर्यंत जाता आले नाही. न्यायाच्या लढाईत जिंकलो. सत्तेच्या लढाईत कमी पडलो. येणा-या निवडणुकीत नवाा उत्साहाने सामारे जायचे आहे. सर्वेवर अवलंबुन न राहात जनतेपर्यंत पोहोचावे. आताचे सत्ताधारी झुंडशाही पद्धतीने काम करीत आहेत. त्यमुळे विकासाची घडी विस्कटली. विस्कटलेली विकासाची ही घडी महाविकास आघाडीच बसवेल. आरक्षणाविषयी बोलताना ते म्हणाले, आरक्षणाची मर्यादा ७० टक्क्यांपर्यंत वाढवून हा प्रश्न सोडवावा. मात्र प्रश्न सुटले तर समाजातील वाद मिटेल. पण भाजपाला हा वादच मिटवायचा नाही. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने एक पैसाही न घेता महिलांचे २१०० बॅक खाते काढून साडे तीनशे कोटी रुपयांची महिलांची बचत करुन पहिली ओवाळणी दिली असल्याचेही ते म्हणाले.