मुंबई : वृत्तसंस्था
ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मालेगाव हवाला आणि अवैध बँक व्यवहाराशी संबधित मनी लॉड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली. ईडीच्या पथकांनी मुंबई आणि अहमदाबाद येथील २ ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत ईडीने तब्बल १३.५० कोटी रुपये रोकड जप्त केली.
ईडीच्या तपासातून समोर आले आहे की, मजुरांची ओळखपत्रे वापरून बँकांमध्ये खाती उघडण्यात आली होती. त्यानंतर या खात्यांचा वापर करून तब्बल १९६ कोटी रुपयांचे व्यवहार केले गेले. या प्रकरणात मुख्य आरोपी मालेगावमधील सिराज मेमन असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
या आठवड्याच्या सुरूवातीला ईडीने याच प्रकरणात भेसनिया वली मोहम्मद याला अटक केली होती. त्याने हवालामार्फत पैसे पाठवण्यासाठी बँकांतून कोट्यवधी रुपये काढले. वली मोहम्मद कर्मचारी असून, त्याचा पगार ३३ हजार आहे. कंपनी मालकाच्या सांगण्यावरून त्याने हे व्यवहार केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. ईडीच्या माहितीनुसार, वली मोहम्मद कंपनीचा एमडी असून, त्याला मोहम्मद समद उर्फ चॅलेंजर किंग म्हणूनही ओळखले जाते. वली मोहम्मद सूरतचा राहणारा आहे.