मुंबई : प्रतिनिधी
मुंबई डोंगरी टणटण पुरा येथील जे. बी. मार्गावर असलेली नूर हॉस्टेल ही पाच मजली इमारत आज (दि.१३) पहाटे ५.३० च्या दरम्यान पत्त्यासारखी कोसळली. रात्री १२.३० च्या दरम्यान इमारतीचा दर्शनीय भाग कोसळला होता. त्यामुळे आजूबाजूच्या इमारतीतील नागरिक देखील सतर्क झाले होते.
इमारत धोकादायक झाल्यामुळे काही दिवसंपूर्वीच रहिवाशांनी आपली घरे खाली करून इतर ठिकाणी स्थलांतर केले होते. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. परंतु, अनेकांचे सामान इमारतीच्या ढिर्गायाखाली दबले गेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
ही इमारत १९१९ ची असून आज घडीला शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला गेला आहे.
या इमारतीत एकूण १८ रहिवाशी तर ४ दुकाने होती. मालक आणि रहिवाशांमध्ये पुनर्विकासा वरून अनेक दिवस वादविवाद सुरू होते. यापूर्वी ही इमारत चार ते पाच वेळा दुरुस्त करण्यात आली होती. परंतु, काही दिवसांपूर्वी रहिवाशांनी घरे खाली केली होती.
नूर होस्टेल इमारत कोसळल्यामुळे आजूबाजूच्या इमारतीला देखील तडे गेले आहेत. सावधगरी म्हणून जवळच्या तीन-चार इमारतीतील रहिवाशांना देखील खाली करण्यात आले आहे. इमारतीच्या तळमजल्यातून अग्निशमन दलाने काही गॅस सिलेंडर ताब्यात घेतले आहे.