17.9 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeराष्ट्रीयजगातील सर्वात शक्तिशाली १०० महिलांमध्ये ३ भारतीय!

जगातील सर्वात शक्तिशाली १०० महिलांमध्ये ३ भारतीय!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
फोर्ब्सने जगभरातील १०० सर्वात शक्तिशाली, प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली. या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह दोन भारतीय उद्योजिकांनी स्थान पटकावले आहे. गेल्यावर्षीच्या यादीत सुद्धा या महिलांनी स्थान पटकावले होते. व्यवसाय, मनोरंजन, राजकीय आणि इतर विविध क्षेत्रातील महिलांची नावे या यादीत आहेत. या क्षेत्रात स्वत:ची वेगळी छाप निर्माण करणा-या महिलांना या यादीत मानाचे स्थान देण्यात येते.

निर्मला सीतारमण : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या यादीत स्थान पटकावले आहे. जगातील प्रभावशाली महिलांमध्ये त्या २८ व्या क्रमांकावर आहेत. मे २०१९ मध्ये त्या भारताच्या पूर्णकालीन अर्थमंत्री झाल्या. जून २०२४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर एनडीए सरकारने त्यांना पुन्हा अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. त्या ४ ट्रिलियन अर्थव्यवस्था असलेल्या भारताची जबाबदारी सांभाळतात. जगातील ही पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्यावेळी या यादीत त्या ३२ व्या क्रमांकावर होत्या. त्यांनी आता चार क्रमांक पुढे झेप घेतली आहे.

रोशनी नाडर मल्होत्रा : फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत रोशनी नाडर-मल्होत्रा या ८१ व्या स्थानावर आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासोबत त्या या यादीत आहेत. रोशनी नाडर मल्होत्रा या ‘एचसीएल’च्या संस्थापक आणि उद्योगपती शिव नाडर यांची मुलगी आहे. एचसीएल टेक्नोलॉजीजचे सीईओ म्हणून त्या काम पाहत आहेत. त्यांनी जुलै २०२० मध्ये वडीलानंतर या पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी पत्रकारिता आणि एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

किरण मुजुमदार-शॉ : जगातील प्रभावशाली महिलांच्या यादीत किरण मुजुमदार-शॉ यांनी स्थान पटकावलं आहे. भारतातील त्या ९१ व्या सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. फोर्ब्सच्या यादीत त्या ८२ व्या क्रमांकावर आहेत. बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांनी बाजी मारली आहे. १९७८ मध्ये त्यांनी बायोफार्मास्युटिकल फर्म बायोकॉन या कंपनीची स्थापना केली. बायोकॉन ही बहुराष्ट्रीय कंपनी ठरली आहे. मलेशियात ही कंपनी इन्सुलीनचे उत्पादन करते. किरण मुजुमदार यांनी कॅन्सरवर संशोधनासाठी ग्लासगो विद्यापीठाला ७.५ दशलक्ष डॉलरची मदत केली होती. तर कोरोना काळात औषध निर्मितीसाठी त्यांच्या कंपनीने मोठी मदत केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR