अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याची घटना घडली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर घडली आहे.
या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर एकच खळबळ उडाली. कॉपी पुरवतानाचा नायब तहसीलदाराचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नायब तहसीलदाराचे नाव अनिल तोडमल आहे.
नायब तहसीलदार अनिल तोडमल यांचा मुलगा बारावीत आहे. सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. अशातच मुलाला मदत म्हणून नायब तहसीलदार पाथर्डीमधील बारावीच्या परीक्षा केंद्रावर पोहोचले. पेपर सुरू झाल्यानंतर त्यांनी मुलाला कॉपी देण्याचा प्रयत्न केला. परंतु, याचवेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तहसीलदार स्वत:च्याच मुलाला कॉपी पुरवत असल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी या परीक्षा केंद्रावर ही घटना घडली असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परीक्षा केंद्र गाठले. संबंधित नायब तहसीलदार अनिल तोडमल यांच्यावर काय कारवाई केली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्यभरात कॉपीच्या ४२ घटना
बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी कॉपीच्या घटना घडताना दिसत आहेत. बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातून कॉपीच्या ४२ घटना समोर आल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेतली असून ‘कॉपीमुक्त परीक्षा’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागासह इतर विभागही आता या प्रकरणी सरसावले आहेत.