नागपूर : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात बुधवारी एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी फरार आरोपीला पकडण्यासाठी १ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, या प्रकरणावर भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची प्रतिक्रिया आली आहे.
माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड गुरुवार दि. २७ फेब्रुवारी रोजी म्हणाले की, निर्भया प्रकरणानंतर कायद्यांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या, मात्र असे गुन्हे केवळ कायदे करून थांबवता येणार नाहीत. महिलांसाठी बनवलेल्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. महिला जिथे जातील तिथे त्यांना सुरक्षित वाटले पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये योग्य तपास, कठोर कारवाई, जलद सुनावणी आणि शिक्षा आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. विरोधी पक्षांनी या घटनेची २०१२ च्या दिल्ली निर्भया घटनेशी तुलना केल्याने सरकारवर दबाव वाढला आहे. आरोपी दत्तात्र्येय रामदास गाडे(३७) याला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक विशेष पथके तयार केली आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, आरोपींचा ठावठिकाणा सांगणा-याला १ लाख रुपयांचे बक्षिसही जाहीर केले आहे.
गुन्हा कसा घडला?
स्वारगेट येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आगार शहरातील सर्वात मोठे बसस्थानक आहे. पीडितेने सांगितले की, मंगळवारी पहाटे ५:४५ वाजता सातारा जिल्ह्यातील फलटण येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना आरोपीने तिला ‘दीदी’ हाक मारली आणि साता-याची बस दुस-या फलाटावर उभी असल्याचे सांगितले. यानंतर आरोपीने तिला रिकाम्या शिवशाही एसी बसमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला.
तपास व पुढील कारवाई
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. एमएसआरटीसी प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. पीडितेच्या जबाबाच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दोषीला लवकरात लवकर अटक करून जलद न्याय मिळवून देण्यासाठी शासन आणि पोलिस प्रशासनावर दबाव वाढत आहे.
परिवहन मंत्री काय म्हणाले?
बस प्रवास करणा-या महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावर असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याची सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिली आहे. याबरोबरच बसस्थानक परिसरातील निर्लेखित बसची विल्हेवाट लावण्यासाठी १५ एप्रिलपर्यंतची वेळ दिली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पद असून या रिक्त पदावर भारतीय पोलीस सेवेतील अधिका-याची नियुक्ती करण्यात यावी. याबाबत प्रस्ताव गृह विभागाला विनाविलंब सादर करण्याची सूचनाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.