पुणे : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीत शिकणा-या एका विद्यार्थ्याची महाविद्यालयात घुसून हत्या करण्यात आली आहे. आज सोमवारी (ता ३०) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. अथर्व पोळ, असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
दुसरा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. ही घटना शहरात वा-यासारखी पसरली असून महाविद्यालयासमोर पालकांसह विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे. पोलिसांकडून सध्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात ही घटना घडली आहे. मृत तरुण आणि आरोपी एकाच वर्गात शिकत होते. सोमवारी दुपारच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये हाणामारी सुरु झाली. यानंतर एकाने दुस-यांवर कोयत्याने वार केला.
या हल्ल्यात अथर्व पोळ याला गंभीर दुखापत झाली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह कर्मचा-यांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अथर्व याला मृत घोषित केले. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. महाविद्यालयात खून झाल्याचे कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार झाला आहे.