26 C
Latur
Friday, July 11, 2025
Homeमहाराष्ट्रदोन्ही शिवसेनेसमोर अस्तित्वाची लढाई

दोन्ही शिवसेनेसमोर अस्तित्वाची लढाई

जागांसाठी होणार झगडा

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेनांना अस्तित्वाची लढाई लढावी लागण्याची चिन्हे आहेत. महायुतीतील एकनाथ शिंदे सेना व महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जागा मिळवण्यापासून झगडा करावा लागण्याची शक्यता आहे. स्वतंत्र लढायचे ठरले तर दोन्ही शिवसेनांमध्ये त्यासाठीच्या बळाचा अभाव दिसतो आहे.

एकत्रित शिवसेनेचे विसर्जित महापालिकेत १० नगरसेवक होते. त्यातील एक जण आता शिंदेसेनेत आहेत, ५ जणांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राहिलेल्या ४ जणांमध्येही चलबिचल सुरू असल्याची चर्चा आहे. अशा वेळी संघटनेमध्येही बरीच गडबड आहे. दोन शहरप्रमुख असतानाही महापालिकेसाठी म्हणून मनसेतून व्हाया वंचित आघाडीमार्फत आलेले पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच राहिलेले वसंत मोरे यांना महापालिका निवडणूक प्रमुख केले आहे. ‘आवाज कोणाचा’ अशी घोषणा असलेल्या शिवसेनेचे शहरात फारसे राजकीय वजन राहिलेले नाही. फुटीनंतर शक्ती क्षीण झाली आहे. १० पैकी ६ जणांनी पक्ष सोडला. मात्र, नेतृत्वाने त्याची म्हणावी, अशी दखलही घेतलेली नाही.

फुटून बाजूला झालेल्या व आपलीच शिवसेना खरी असा दावा करणा-या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही शहरात पाय रोवणे अद्याप शक्य झालेले नाही. फुटीनंतर फक्त एका माजी नगरसेवकाने प्रवेश केला. त्यांना शहराध्यक्ष केले गेले. ते आहेत उपनगरातील, त्यांना त्यांच्याही निवडणुकीची काळजी. संपर्क प्रमुख असलेले अजय भोसले यांनाही शहरात नव्याने संघटन करता आलेले नाही. काँग्रेसचे माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर यांना पक्षात प्रवेश देत महानगरप्रमुख हे नवे पद देण्यात आले. त्यामुळे अन्य पदाधिकारी जपून पावले टाकताना दिसतात. धंगेकर यांनाही जोरदार सुरूवात करता आलेली नाही, असेच दिसते आहे. अन्य काही पदाधिकारी आहेत; पण त्यांना अजून संपूर्ण शहरात लोकप्रियता नाही.

अशा राजकीय पटावर युती आघाडी अशी निवडणूक झालीच तर महायुतीमध्ये शिंदेसेनेवर व मविआत उद्धव सेनेवर जागा वाटपामध्ये बरीच तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. दोन्ही ठिकाणी त्यांचे मित्रपक्ष त्यांच्यापेक्षा वरचढ आहेत. युतीमध्ये भाजप व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शिंदेसेनेला मोठे होऊ देईल, असे दिसत नाही. मविआत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आधी काँग्रेसवर व नंतर शिवसेनेवर जोर राहील असे दिसते. स्वतंत्रपणे निवडणूक झालीच तर भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी यांची शहरात राजकीय ताकद आहे. मविआत काँग्रेस व उद्धवसेना यांच्यात फार फरक नाही; पण तरीही काँग्रेसचा हात मोठा राहण्याची चिन्हे आहेत. स्वबळावर लढण्याइतके राजकीय बळ दोन्ही शिवसेनांकडे नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR