मुरैना : मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडून मुरैना जिल्ह्यात पोहोचलेल्या १९ महिन्यांच्या चित्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा चित्ता जखमी अवस्थेत आढळल्यानंतर कुनो राष्ट्रीय उद्यानात आणून त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी जबलपूर येथील पशुवैद्यकीय केंद्रात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या प्राथमिक माहितीनुसार, चित्त्याला गोळी मारण्यात आली होती.
त्याच्या पोटात अनेक छर्रे आढळले आहेत. २५ ऑक्टोबरच्या रात्री मुरैना आणि श्योपूर जिल्ह्यांच्या सीमेवरून त्याची सुटका करण्यात आली होती. गोळी मारून चित्त्याचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना असल्याचे वृत्त आहे. चित्त्याची शिकार करण्याचा प्रयत्न झाल्याने पंतप्रधान मोदींच्या चित्ता पुनर्वसन प्रकल्पाला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
१७ सप्टेंबर २०२२ रोजी नामिबियातून ८ चित्ते भारतात आणण्यात आले होते. त्यानंतर भारतात चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येत आहे. मात्र, या घटनेमुळे चित्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चित्त्याला कोणत्या शस्त्रातून गोळी मारण्यात आली, याचा तपास वन विभागाकडून सुरू आहे. या परिसरातील वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी विशेष व्याघ्र हल्ला प्रतिसाद दल तैनात करण्यात आले आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी वन विभाग मध्य प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाचीही मदत घेत आहे.
मुरैना परिसरात चंबळ खो-यातील बीहड म्हणजेच दुर्गम आणि खोल द-यांचा प्रदेश आहे. या भागात देशी बनावटीची बंदुके सहज उपलब्ध होत असल्याचे सांगितले जाते. चित्ता अचानक दिसल्याने हल्लेखोर घाबरला असावा आणि त्याने गोळी झाडली असावी, अशी एक शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याने चित्त्याला बिबट्याा समजून गोळी मारली असावी, असाही संशय आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोणत्याही संशयिताची ओळख पटलेली नाही. चित्त्याला झालेल्या जखमांचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे कुनो प्रशासनाने सांगितले आहे. गोळीबाराच्या घटनेबाबत चित्ता प्रकल्पाच्या अधिका-यांनी अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही.
दरम्यान, कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या आसपासच्या भागात बेकायदा शिकारीचा धोका यापूर्वीही समोर आला आहे. काही वर्षांपूर्वी कुनोच्या बफर क्षेत्रात शिका-यांनी एका बिबट्याला ठार केले होते. याच परिसरात हरणांची शिकार झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. त्यामुळे चित्त्याच्या मृत्यूमुळे या भागातील वन्यजीव संरक्षण आणि शिकारीविरोधी यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या वन विभागाकडून आरोपींचा शोध आणि घटनेमागील कारणांचा तपास सुरू असून, चित्त्याला नेमक्या कोणत्या परिस्थितीत गोळी मारण्यात आली, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
















