मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज पहिली जयंती आहे. यानिमित्त त्यांच्या कुटुंबासह कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. या प्रसंगावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू असल्याचे म्हणत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
आजचा २२ जुलैचा दिवस हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि त्याचवेळी महायुतीचे एक शिल्पकार, अजित पवार यांच्या उदास करणा-या स्मृती घेऊन आलेला आहे. एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू असा हा दिवस आहे. अजितदादांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. दादांची जागा कोणीही भरून काढणे शक्य नाही. मात्र दादांच्याच कार्यपथावरून वाटचाल करताना, सुखी-संपन्न महाराष्ट्र घडविण्याची दादांची इच्छा पूर्ण करण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना बळ मिळो, अशा सदिच्छा मी देतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, कार्यकर्ते कसे सांभाळावेत, वक्तशीर कसे असावे, दिवसातला प्रत्येक क्षण कामात कसा घालवावा आणि त्याचवेळी प्रशासनावरही पकड ठेवावी, अशा अनेक बाबींचा धडा अजित पवार यांनी घालून दिला आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी महायुतीच्या सर्व वचनांची पूर्तता अर्थसंकल्पातून केली होती. शेतीचे आणि शेतक-यांचे प्रश्न, सहकारातील समस्या यांचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. आम्ही एकत्रितरीत्या महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक प्रगतीची स्वप्ने पाहिली होती. परंतु काळाने त्यांच्यावर अचानक घाला घातला. दादांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. दिवस येतील-जातील, कालचक्र फिरत राहील, दादांच्या स्मृतींचा सुगंध सदैव दरवळत राहील.
फडणवीसांनाही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तर आणखी एक पोस्ट करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बुद्धिमान, अभ्यासू आणि अष्टपैलू नेतृत्व, राजकारणातील चालते-बोलते विद्यापीठ, विकासाची आधुनिक दृष्टी असलेले लोकनेते, कर्तृत्व आणि दातृत्वाचे महामेरू अशी ख्याती असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि परममित्र देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा,’ अशी भली मोठी पोस्ट करत एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.
















