जम्मू : काश्मीर खोरे आणि लडाखला वर्षभर जोडणाऱ्या रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या जोजिला टनल प्रकल्पाने एक ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रिमोटचे बटन दाबून अंतिम ब्रेकथ्रू ब्लास्ट केला, ज्यामध्ये सुरंगेची शेवटची २.५ मीटरची खडकाची भिंत यशस्वीरीत्या पाडण्यात आली. या अंतिम ब्लास्टमुळे १३.१५ किलोमीटर लांब असलेल्या या भुयाराचे दोन्ही टोक आता एकमेकांना जोडले गेले आहेत.
समुद्रसपाटीपासून तब्बल ११,५७८ फूट उंचीवर बांधण्यात येत असलेली जोजिला टनल ही जगातील सर्वात जास्त उंचीवरील आणि आशियातील सर्वात लांब सिंगल-ट्यूब बाय-डायरेक्शनल रस्ते सुरंग ठरणार आहे. या अंतिम ब्रेकथ्रूमुळे सुरंगेच्या खोदकामाचा टप्पा आता पूर्ण झाला असून प्रकल्पाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. या ऐतिहासिक क्षणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला प्रामुख्याने उपस्थित होते.
सोनमर्ग ते मीनामार्ग दरम्यान सुमारे ६,८०० कोटी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या या टनलमुळे साडेतीन तासांचा खडतर प्रवास आता अवघ्या १५ ते २० मिनिटांत होणार आहे. भुयारीकरणाचे कठीण काम नियोजित वेळेच्या आधीच पूर्ण झाले असून आता पुढील टप्प्यात सुरंगेचे काँक्रिटीकरण, अंतर्गत रस्ते बांधणी, वायुविजन यंत्रणा, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा बसवण्याचे काम सुरू होईल. हे काम पुढील २४ महिन्यांत पूर्ण केले जाईल आणि हा प्रकल्प फेब्रुवारी २०२८ पर्यंत सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे खुला होण्याची शक्यता आहे.
हिवाळ्यात अतिवृष्टी, बर्फवृष्टी आणि कडाक्याच्या थंडीमुळे जोजिला पास वर्षभरातून किमान ५ महिने बंद पडायचा, ज्यामुळे लडाखचा देशाच्या उर्वरित भागाशी संपर्क तुटायचा. ही टनल सुरू झाल्यावर वर्षभराचे ३६५ दिवस अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल. यामुळे एलएसी आणि एलओसी वर तैनात असलेल्या भारतीय सैन्याला रसद आणि दारूगोळा पुरवणे सोपे होणार असून, लडाखच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे.
















