मुंबई (प्रतिनिधी) : पुण्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती लक्षात घेऊन तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील. तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकतानगर, सिंहगड येथे पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरू करा, असे निर्देश देताना निळ्या पूररेषेतील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका, जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी येथे दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने वर्षा येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत पुण्यातील पूरस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. एकतानगर, सिंहगड या ठिकाणी निळ्या पूर रेषेत सुमारे ३ लाख घरे असून ती अनेक वर्षांपासून आहेत, अशी माहिती पालिका आयुक्तांनी बैठकीत दिली. या ठिकाणी एफएसआय मिळत नसल्याने विकासक पुनर्विकासासाठी पुढे येत नाहीत, असेही त्यांनी निदर्शनास आणले. त्या वेळी शिंदे यांनी या ठिकाणी विशेष दर्जा देऊन पुनर्विकासाचे काम करावे तसेच तसा आराखडा तयार करावा, असे निर्देश दिले.
जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी खडकवासला धरणातून पाणी सोडताना पुरेशी सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्याची माहिती दिली तसेच पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या वेळी पूर परिस्थितीत प्रशासनाने तत्परतेने केलेल्या मदत आणि बचाव कार्याविषयी सांगितले. धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याचेही ते म्हणाले. भविष्यात या भागात पुराचा धोका होऊ नये म्हणून नदी सुधार प्रकल्पात पूर संरक्षकाचा विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
पूर परिस्थितीत पुण्यातील वाहनांचे मोठे नुकसान झाले; पण नियमांमुळे नुकसानभरपाई मिळत नाही, असे या वेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर शिंदे यांनी पुणे पालिका आयुक्त आणि जिल्हाधिका-यांना विमा कंपन्यांशी एकत्रितपणे बोलून यावर मार्ग काढण्यास आणि तातडीने वाहनधारकांना नुकसानभरपाई मिळावी, अशा सूचना केल्या. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना विविध संस्थांकडून मदत करण्यात येत आहे मात्र जिल्हाधिका-यांनीदेखील पुरेसे अन्नधान्य असलेले संच पूरग्रस्त एकतानगर, सिंहगड येथील गोरगरीब नागरिकांना पुरवावेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या वेळी एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्याशी बोलून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या बैठकीला मनसेचे पदाधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.