सांगली : धर्मांतरासाठी येणा-या पादरीचा जो कुणी सैराट करेल त्याला ११ लाखांचे बक्षीस जाहीर करा असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केले. धर्मांतरण करण्यासाठी ऋतुजा राजगे या सात महिन्यांच्या गरोदर महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-यांना कडक शिक्षा करा असेही ते म्हणाले. धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणणा-या ख्रिश्चन पादरीला सहआरोपी करावे यासाठी सांगलीत मशाल मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.
सांगलीतील यशवंतनगर येथे धर्मांतरासाठी तगादा लावलेल्या सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून ऋतुजा राजगे या सात महिन्यांच्या गर्भवतीने आत्महत्या केली होती. त्यामुळे धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, तसेच तिला धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडणा-या पादरीवर गुन्हा दाखल करून त्याला देखील सहआरोपी करा अशी मागणी गोपीचंद पडळकरांनी केली.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, आपल्याकडे बैलगाडीच्या शर्यतीसाठी बक्षीसं ठेवली जातात. त्याप्रमाणे धर्मांतरासाठी येणा-या पादरी लोकांना ठोकण्यासाठी बक्षीसं ठेवली पाहिजेत. पहिल्या पादरीला ठोकेल त्याला पाच लाखांचे बक्षीस. दुस-याला मारेल त्याला चार लाखांचे, तर तिस-याला मारेल त्याला तीन लाखांचे बक्षीस. जो कुणी पादरीचा सैराट करेल त्याला ११ लाखांचे बक्षीस ठेवले पाहिजे.
मशाल मूक मोर्चासाठी सांगलीमध्ये लावण्यात आलेले पोस्टर्स प्रशासनाने काढले. त्यावर बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, आम्ही कायदा मानणारे लोक आहोत. आमचे बोर्ड अनधिकृत वाटले म्हणून प्रशासनाने ते काढले. पण ज्या पद्धतीने ही कारवाई केली त्या पद्धतीने त्यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व बेकायदेशील प्रार्थनास्थळांवर कारवाई केली पाहिजे. या सगळ्या बेकायदेशीर प्रार्थनास्थळांची यादी काढून त्यावर बुलडोझर फिरवला पाहिजे. त्यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि महापालिका आयुक्तांचा आपण जाहीर सत्कार करू. जर का अनधिकृत प्रार्थना स्थळे प्रशासनाने हटवली नाहीत तर हिंदुंशी गाठ असेल.