नागपूर : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी जात पडताळणी समिती रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी जरांगे अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा आज रविवारी दुसरा दिवस आहे. एकीकडे मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्या परभणीतील कार्यक्रमाला दर्शवला आहे. अंतरवाली सराटीतून आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे यांच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मागणीवर मार्ग काढणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मला असे वाटते की जे काही आंदोलन चालले आहे. त्या आंदोलनात सरकारचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत. ते चर्चा करणार आहेत. यापूर्वीही आपण मार्ग काढला आहे. पुढेही आपण मार्ग काढणार आहोत. उपमुख्यमंत्री शिंदे हे सुरवातीपासून अतिशय संवेदनशीलतेने काम करत आहेत. जात पडताळणी समिती रद्द करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ज्या काही मागण्या कायदेशीर असतील, संविधानच्या अंतर्गत असतील आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन करणा-या नसतील, अशा सगळ्या मागण्यांकरिता आम्ही चर्चेची दारे खुली ठेवली आहेत.
















