भोकर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भरधाव वाहन घुसले. भोकर शहरात रविवारी रात्री झालेल्या या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. तर अन्य एक गंभीर जखमी झाला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी रात्री ९ च्या सुमारास प्रफुल्लनगर येथून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक मुख्य चौकात दाखल होण्यासाठी उड्डाणपुलावरून जात असताना विरुद्ध दिशेने म्हणजेच नांदेडकडून येणारे भरधाव पिकअप बोलेरो (क्र. एमएच २६ सीएच ३७४१) हे वाहन अचानक मिरवणुकीत घुसले. या अपघातात प्रफुल्लनगर येथील संदीप भीमराव गायकवाड हा युवक गंभीर जखमी झाला.
उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर खंडेश्वर भारत जिलेवाड हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जयंतीच्या या मिरवणुकीत हजारो लोकांचा सहभाग होता. अपघातग्रस्त वाहन थांबले नसते तर मोठी दुर्घटना झाला असली. यामुळे पोलिसांनी मिरवणुकी दरम्यान वाहतुकीचे योग्य नियोजन केले नव्हते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
















