लातूर : लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या प्रांगणात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळयाचा अनावरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की एकीकडे विलासराव तर दुुसरीकडे गोपीनाथरावांचा पुतळा म्हणजेच दोन्ही मित्र स्मारकाच्या रुपात पुन्हा एकत्र आले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकीकडे विलासराव देशमुख यांचा पुतळा आहे, मुख्यमंत्री म्हणून, देशाचे मंत्री म्हणून त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली आणि मुंडे आणि विलासरावजी यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे दोन्ही मित्र स्मारकाच्या स्वरूपातही पुन्हा एकदा सोबत आले. हा विलक्षण असा योगायोग आहे.
आपण जर गोपीनाथरावांचे जीवन जर पाहिले तर सातत्याने संघर्ष करणारे गोपीनाथराव आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सामान्य कार्यकर्त्यापासून ते देशाचे मंत्री ही वाटचाल त्यांच्या संघर्षातून साकार झाली आहे. खरेतर आपण विचार करा अवघ्या ३५-३७ व्या वर्षी गोपीनाथराव भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले.
महाराष्ट्रात त्यावेळी भाजपच्या नेतृत्वाने हा निर्णय घेतला की आपल्याला तरुण रक्त पाहिजे, आपला पक्ष वाढवण्यासाठी तरुणाई पाहिजे, संघर्ष करणारे पाहिजेत आणि पक्षाने संघर्ष करणारे तरुण एकत्रित केले आणि त्यांचे नेतृत्व करणारी संधी ही गोपीनाथरावांना मिळाली. त्यावेळी पक्षात अनेक ज्येष्ठ लोक होते, पण पक्षाला माहीत होते की सामान्य माणसात पक्ष पोहोचवायचा असेल तर असा संघर्ष करणारा तरुण हा आपल्याला पक्षाचा नेता म्हणून दिला पाहिजे. जेव्हापासून गोपीनाथरावांनी नेतृत्व सांभाळले तेव्हापासून त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही आणि एक मोठे संघटन त्यांनी तयार केले.

