21.6 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच

मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच

कौन बनेगा मुख्यमंत्री? शिंदे-फडणवीस यांच्यासाठी दोन्ही पक्ष आग्रही, वाद दिल्ली दरबारी शुक्रवारी शपथविधी होण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळूनही मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याने नव्या सरकारच्या आगमनाला अजून मुहूर्त मिळालेला नाही. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला एवढा मोठा विजय मिळाल्याने सरकारचे नेतृत्व त्यांच्याकडेच ठेवावे, असा त्यांच्या आमदारांचा आग्रह आहे तर भाजपाचे दुपटीपेक्षा अधिक आमदार असताना या वेळी आमचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत भाजपाने देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही फडणवीस यांच्याच नावाला पसंती दिली. या वादावर अंतिम निर्णय दिल्लीत होणार असून तिन्ही पक्षांचे नेते रात्री दिल्लीत जाण्याची शक्यता आहे. यामुळे बुधवारी अपेक्षित असलेला नव्या सरकारचा शपथविधी शुक्रवारपर्यंत पुढे जाण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवले आहे; परंतु निकाल लागून दोन दिवस झाले तरी नवे सरकार कधी येणार? ते कोणाच्या नेतृत्वाखाली येणार? या प्रश्नाला उत्तर मिळालेले नाही.

या निवडणुकीत जवळपास ९० टक्क्याच्या स्ट्राईक रेटसह भाजपाने १३२ जागा जिंकल्या आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ५७ व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले आहेत त्यामुळे या वेळी मुख्यमंत्रिपद भाजपाकडेच असले पाहिजे, असा भाजपा आमदारांचा आग्रह आहे.

भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. रा. स्व. संघाचाही त्यांच्या नावाला पाठिंबा असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांच्याच नावाला पसंती दिली आहे तर दुसरीकडे ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली व महायुतीला मिळालेल्या यशात त्यांचा मोठा वाटा असल्याने त्यांच्याच कडे नेतृत्व ठेवावे, असा शिवसेनेच्या आमदारांचा आग्रह आहे.

दोन-तीन महिन्यांत राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्यांचेच नेतृत्व असले पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे.
शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली. मात्र मुख्यमंत्रिपदासाठी नाही तर विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतल्याच्या दावा त्यांनी केला.

दिल्लीत होणार निर्णय
मुख्यमंत्रिपदाबाबत आता दिल्लीत यावर निर्णय होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह व राजनाथसिंह या ज्येष्ठ नेत्यांच्या दरबारात हा विषय गेला असून शिंदे, फडणवीस व अजित पवार यांची रात्री उशिरा किंवा उद्या दिल्लीत बैठक होण्याची शक्यता आहे.

अमित शाह आज मुंबईत?
महायुतीत सत्तेतील वाट्यावरून रस्सीखेच सुरु आहे. तब्बल १३२ जागा जिंकणारा भाजप मुख्यमंत्री सोडण्यास तयार नाही तर अडीच वर्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेचा तिढा कायम आहे. तो सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी मुंबईत येणार आहेत. अमित शाहच मुख्यमंत्रिपदाबद्दल घोषणा करतील. मंत्रिपदांच्या वाटपाचा विषयदेखील शहाच मार्गी लावणार आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

शुक्रवारी शपथविधी?
मुख्यमंत्रिपदाच्या पेचामुळे सत्तास्थापनेचा बुधवारचा मुहुर्त लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. २९ तारखेला सायंकाळी शपथविधी अपेक्षित आहे. शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले जाणार का? भाजपा स्वत:कडेच हे पद ठेवणार असेल तर फडणवीस यांचेच नाव अंतिम होणार की विनोद तावडे म्हणाले. त्याप्रमाणे कोणी तरी नवीन चेहरा पुढे येणार? याबद्दल प्रचंड कुतूहल आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR