नाशिक : सध्या राज्यात कांद्याच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक येथील सभेत याचा प्रत्यय आला. सभेत मोदींच्या भाषणादरम्यान, एका तरुणाने अचानक कांद्याचा प्रश्न उपस्थित करत गोंधळ घातला. पोलिसांनी त्या तरुणाला लगेच बाहेर काढलं. पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवारांचा कार्यकर्ता असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवूनही कांद्याच्या दरात वाढ झालेली नाही. निर्यातमूल्य आणि निर्यात करामुळे कांद्यावर लादलेल्या अघोषित निर्यातबंदीमुळे शेतक-यांना आर्थिक नुकसान होत आहे.
नाशिकच्या पिंपळगाव येथे नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह छगन भुजबळ देखील उपस्थित होते. मात्र मोदी भाषणाला उभे राहताच सभेत मोठा गोंधळ उडाला. पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना अचानक एका तरुणाने मध्येच उठत ‘कांद्यावर बोला’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला बाहेर काढले. मात्र आता हा तरुण शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती पुढे आली आहे.
तरुणाच्या घोषणाबाजीनंतर पंतप्रधान मोदींनी काही सेकंद भाषण थांबवले होते. त्यानंतर व्यासपीठावरून देवेंद्र फडणवीस यांनी हातवारे करून तरुणाला खाली बसण्याचा सल्ला दिला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही मोदी.. मोदी..च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांच्या घोषणेनंतर मोदींनी जय श्री राम आणि भारत माता की जयच्या घोषणा द्यायला सुरुवात केली.
किरण सानप हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आयटी सेलचा पदाधिकारी आहे. दुसरीकडे शरद पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी किरण सानपचे कौतुक केले आहे. मोदींना कांद्यावर बोला असे तरुण शेतक-यांनी प्रश्न विचारला तर तो योग्यच आहे. मोदींनी कांदा उत्पादक शेतक-यांची मानसिकता समजून घ्यायला हवी. किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे का तर माहीत नाही. मात्र असेल तर त्याचा मला अभिमान आहे, असे पवार यांनी म्हटले.