26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeमहाराष्ट्रगुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला बेड्या

गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला बेड्या

तरुणावर गोळीबार प्रकरण

पुणे : कोथरूड येथे तरुणावर गोळीबार केल्याप्रकरणात फरार असलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक २ च्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे ८७८ ग्रॅम गांजा सापडला. मुसाब इलाही शेख (३५, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

खंडणी विरोधी पथकातील पोलिस निरीक्षक वाहीद पठाण, पोलिस उपनिरीक्षक गौरव देव हे पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार अमोल घावटे यांना आरोपी विषयी माहिती मिळाली. तेथे जाऊन पाहणी केली असता, त्यांना एक व्यक्ती उभा असलेला दिसला. पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्याच्या खांद्यावर एक सॅक होती. पोलिसांना बघताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. यावेळी मुसाब इलाही शेख याच्याकडे पोलिसांना गांजा आढळून आला. हा गांजा त्याने विक्री करण्यासाठी स्वत: जवळ बाळगल्याचे पोलिस चौकशीत समोर आले. त्याने हा गांजा तेजस पूनमचंद डांगी (३३, रा. रमाना सृष्टी, मानाजीनगर, न-हे) याच्याकडून घेतल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी डांगी याला देखील ताब्यात घेत अटक केली.

मुसाब याला आता मकोका प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर जबरी चोरी, गंभीर मारहाण, हत्यार बाळगणे, खुनाचा प्रयत्न अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ चे पोलिस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, दिलीप गोरे, अमोल राऊत, पवन भोसले, गणेश खरात, प्रशांत शिंदे, चेतन आपटे, किरण पड्याळ व संदेश काकडे यांच्या पथकाने केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR