मुंबई : छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून मध्यरात्रीपासून ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाचा जोर अधिक असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, शहरांत सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्याने गटारीचे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे रस्त्यावरच घाण येऊन थांबली. त्यामुळे वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली.
पुणे, सोलापूर, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीडमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर आणि मंगळवारी दुपारनंतर राज्यात ब-याच भागात आणि मराठवाड्यातही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात गेल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या शेत शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने काढणी खोळंबली असून, हातातोंडाला आलेला घास पावसामुळे हिसकावला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. अनेक ठिकाणी फळबागा धोक्यात आल्या आहेत.
पुणे शहरात मंगळवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. पुणे शहरासह ग्रामीण भाग, त्याचबरोबर धरण क्षेत्रातदेखील पावसाने दमदार हजेरी लावली. पुढील तीन ते चार दिवस असाच पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यासोबतच कोल्हापूर, सातारा भागातही पाऊस कोसळत आहे. कोकणातही पावसाचा जोर वाढला आहे. सिंधुदुर्गात आज ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे दरड कोसळून अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला. याशिवाय मुंबईसह पालघर जिल्ह्यातही जोरधार सुरू आहे. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मराठवाड्यात कोसळधार, शेतपिकांची मोठी हानी
मराठवाड्यात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर आणि मंगळवारी दुपारनंतर या भागांत जोरदार पाऊस कोसळला. पावसाचा जोर अधिक असल्याने काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहात असून, शेतशिवारात पाणीच पाणी झाल्याने खरीप पिके पाण्यात बुडाली आहेत. यात सोयाबीनचे मोठे नुकसान होत आहे. लातूरमध्ये मंगळवारी सायंकाळी तुफान पाऊस झाला. शहरात तर रस्त्याला तलावाचे स्वरूप आले. त्यामुळे वाहतूक खोळंबली. परभणी जिल्ह्यात मंगळवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही दुपारनंतर जोरदार पाऊस कोसळला. तसेच बीड, धाराशिवमध्येही पावसाने हजेरी लावली. छ. संभाजीनगर, जालन्यातही जोर वाढला आहे. त्यामुळे सोयाबीन पाण्यात भिजत असून, पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
निम्न तेरणाचे ४ दरवाजे उघडले
धाराशिव, लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळल्याने औसा, लोहारा तालुक्याच्या सीमेवर असलेले निम्न तेरणा धरण भरले असून, मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता ४ दरवाजे १० सेंटिमीटरने उघडून १५२६ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.