झाशी : झाशी-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात माफिया आणि माजी खासदार अतीक अहमदच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अबान अहमद असे त्याचे नाव असून अबानच्या एका सहका-याचाही मृत्यू झाला आहे. कारमधील इतर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अबान अहमद त्याच्या मित्रांसोबत झाशी तुरुंगामध्ये असलेला त्याचा भाऊ अली अहमद याला भेटण्यासाठी गेला होता. भावाला भेटून परत येताना कानपूर-झाशी महामार्गावर पूंछ पोलिस ठाण्याजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. कार अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण पाचजण होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, यावेळी डॉक्टरांनी अबान अहमद आणि सोनू यांना मृत्यू घोषित केले. तसेच उमर अहमद, मोहम्मद जैद आणि असलम हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी झाशी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.
















