मुंबई : प्रतिनिधी
इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग-याहून सुटकेच्या प्रसंगावरून ज्येष्ठ मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आले आहे. आग-याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही पेटा-यांचा वापर केला नव्हता, तर त्यांनी चक्क औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्यावरून शिवप्रेमींत तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोलापूरकर यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल सोलापूरकर यांचे डोके फिरले आहे. त्यांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात म्हणाले.
राहुल सोलापूरकर यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे. याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सचिन खरात गट पक्ष जाहीरपणे निषेध करत आहे. मुळात यांच्या मनातच बहुजन राजांबद्दल द्वेष आहे, हे त्यांच्या वक्तव्यातून जाणवते. पण आता भाजप सरकार आल्यापासून यांच्या मनातील खरे विचार उफाळून येत आहेत. त्यामुळे राहुल सोलापूरकर यांची ब्राह्मण्यवादी मानसिकता बाहेर आली. त्यांचे डोके फिरलेय, त्यांना ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करा, असे सचिन खरात म्हणाले.
राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराज आग््रयाहून सुटले, मिठाईचे पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन महाराज आले आणि त्यासाठी किती हुंड्या वटवल्या आहेत, याचेसुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलासुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे. मोहसिन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचं.. त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची अजूनही खूण सुद्धा आहे. लोकांना गोष्टी रूपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावे लागते. मग ती रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा बाजूला टाकला जातो, असे सोलापूरकर एका मुलाखतीत म्हणाले.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘ही तीच पिलावळ आहे, ज्यांना या मातीतील चार्वाक, बसवेश्वर, बुद्ध, छत्रपती शिवराय, विश्वरत्न बाबासाहेब, म. ज्योतिबा फुले, म. गांधी हे आदर्श मोडीत काढून गोळवलकर, हेडगेवार, मुखर्जी हे नवे आदर्श प्रस्थापित करायचे आहेत. हे सांस्कृतिक राजकारण ओळखा,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.