मुंबई : प्रतिनिधी
छोट्या पडद्यावरील विविध मालिका आणि नाटकांमधून भूमिका साकारणारा आणि प्रेक्षकांच्या ओळखीचा चेहरा झालेल्या अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. गेल्या अनेक दिवसांपासून तुषारला कोणतेच काम मिळत नव्हते. त्यामुळे तुषारला प्रचंड नैराश्य आले होते. याच नैराश्याच्या भरात तुषार घाडीगावकर याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.
तुषार घाडीगावकर हा मुंबईतील भांडूपमध्ये वास्तव्याला होता. त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. तुषार घाडीगावकरने आजपर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये लहान पण लक्षात राहणा-या भूमिका केल्या होत्या. छोट्या पडद्यावरील लवंगी मिरची, मन कस्तुरी रे, सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकांमध्ये काम केले होते तर भाऊबळी, उनाड, झोंबिवली, या मराठी चित्रपटांमध्येही तुषारने भूमिका साकारली होती. तसेच संगीत बिबट आख्यान या नाटकातही तुषार घाडीगावकरने काम केले होते. अलीकडेच सन मराठी वृत्तवाहिनीवर सुरु झालेल्या सखा माझा पांडुरंग मालिकेतही तो झळकला होता.
तुषार घाडीगावकर हा मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा होता. त्याने रुपारेल महाविद्यालयात असताना अभिनयाची सुरुवात केली होती. इतक्या तरुण अभिनेत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने मराठी कलाविश्वात खळबळ उडाली आहे.