मुंबई : प्रतिनिधी
मराठी सिनेमात १९८० ते ९०च्या दशकाचा काळ रुपेरी पडद्यावर गाजवणा-या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाबद्दल तीव्र असमाधान व्यक्त करीत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिलेला व्ही शांताराम गौरव पुरस्कार शासनालाच परत केला. त्यांनी हा पुरस्कार ठाण्यातील आनंदाश्रमात आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर ठेवला. याची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
पुण्यातील जमिनीचा टीडीआर शासनाकडून मिळत नाही. या प्रकरणी संबंधित आयुक्त राम यांच्याकडून न्याय मिळत नसल्याने त्यांनी ही भूमिका घेतली. पुण्यातील टीडीआर प्रकरणी न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला असतानाही त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी शासनाचा हा पुरस्कार परत केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. त्यामुळे आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कलाकारांवर प्रेम करणारे आहेत, ते नक्कीच उषाताईंना न्याय मिळवून देतील, असा विश्वास अभिनेते मंगेश देसाई यांनी व्यक्त केला. उषा चव्हाण या जेष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक हीट मराठी सिनेमे दिले आहेत. शासनाने नुकताच त्यांना व्ही. शांताराम पुरस्कार देऊन गौरव केला होता.
















