20.6 C
Latur
Friday, December 5, 2025
Homeराष्ट्रीयनववर्ष खरेदीत ‘व्होकल फॉर लोकल’ स्वीकारा

नववर्ष खरेदीत ‘व्होकल फॉर लोकल’ स्वीकारा

मन की बातमधून पंतप्रधानांचे देशवासीयांना आवाहन राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद मिळवणे गौरवास्पद

नवी दिल्ली : सण आणि नवीन वर्षाच्या खरेदीमध्येही भारतीयांनी व्होकल फॉर लोकल स्वीकारण्याचे आवाहन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी मन की बातमधून रविवार दि. ३० नोव्हेंबर रोजी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या १२८ व्या भागात रविवारी भारतात खेळांची प्रगती, विंटर टुरिझम, व्होकल फॉर लोकल यासोबतच वाराणसीमध्ये होणा-या काशी-तमिळ संगममचा उल्लेख केला.

पंतप्रधानांनी सांगितले की, भारतीय खेळांसाठी हा महिना शानदार राहिला. याची सुरुवात महिला संघाच्या आयसीसी महिला विश्वचषक विजयाने झाली. भारताला राष्ट्रकुल खेळांच्या यजमानपदाचीही घोषणा झाली. टोकियोमध्ये झालेल्या डेफ ऑलिम्पिक्समध्ये भारताने विक्रमी २० पदके जिंकली. महिला कबड्डी संघाने विश्वचषक जिंकून इतिहास रचला आणि बॉक्सिंग कपमध्येही भारताने २० पदके मिळवली.

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वंदेमातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात होणा-या कार्यक्रमांची शानदार सुरुवात झाली. २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील राम मंदिरावर धर्मध्वजाचे आरोहण झाले. याच दिवशी कुरुक्षेत्रातील ज्योतिसर येथे पांचजन्य स्मारकाचे लोकार्पण झाले. पंतप्रधानांनी सांगितले की ते नेहमी व्होकल फॉर लोकलबद्दल बोलतात. जी २० मध्येही त्यांनी हीच भावना ठेवून परदेशी नेत्यांना भारतीय हस्तकलेची भेट दिली. दक्षिण आफ्रिकेला नटराज प्रतिमा, कॅनडाला चांदीचा घोडा, जपानला चांदीचे बुद्ध, इटलीला चांदीचा आरसा आणि ऑस्ट्रेलियाला पितळी उरळी. ते म्हणाले की, देश आता स्वदेशी उत्पादने स्वीकारत आहे, दुकानदार आणि तरुणांनीही ते स्वीकारले आहे.

नौदल वेगाने आत्मनिर्भर होत आहे
पंतप्रधानांनी सांगितले की, भारताची सुरक्षा मजबूत झाल्यावर प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटतो. अलीकडेच कठर माहेला नौदलात समाविष्ट करण्यात आले. याची स्वदेशी रचना चर्चेत राहिली आणि पुडुचेरी-मालाबारमधील लोक या नावामुळे आनंदी झाले, कारण हे ऐतिहासिक ठिकाण माहेवर आधारित आहे. याच्या क्रेस्टमध्ये उरुमी आणि कलारिपयट्टच्या पारंपरिक तलवारीसारखी झलक आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, नौदल वेगाने आत्मनिर्भर होत आहे. ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जाईल.

उत्तराखंडमध्ये हिवाळी पर्यटन वाढतेय
पंतप्रधान म्हणाले की, हिवाळ्यासोबतच हिवाळी पर्यटनाचा हंगामही सुरू झाला आहे. अनेक देश स्कीइंग, स्रो-ट्रेकिंग आणि हिवाळी उत्सवांमधून मोठी कमाई करतात. भारतातही डोंगर, संस्कृती आणि साहसाची पूर्ण क्षमता आहे. उत्तराखंडमधील हिवाळी पर्यटन वेगाने लोकप्रिय होत आहे, विशेषत: औली, मुनस्यारी, चोपटा आणि डेयारा येथे.

स्थानिक उत्पादने स्वीकारण्याचे आवाहन
पंतप्रधानांनी सांगितले की, मधामागे लोकांची मेहनत आणि निसर्गाचा समन्वय दडलेला असतो. जम्मू-काश्मीरमधील पांढरा रामबन सुलाई मध आता जीआय टॅग मिळाल्यानंतर देशभरात प्रसिद्ध झाला आहे. कर्नाटकातील पुत्तूर आणि तुमकुरु येथील संस्थांनी आधुनिक प्रक्रिया, पॅकेजिंग आणि मधमाशी पेट्या देऊन शेतक-यांचे उत्पन्न वाढवले आहे. नागालँडमध्ये उंच खडकांमधून धोकादायक पद्धतीने मध गोळा केला जातो. देशात मध उत्पादन आता दीड लाख मेट्रिक टन पार केले आहे आणि निर्यात तिप्पट वाढली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR