कराची : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ आणि मेलबर्नमध्ये झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर आता पाकिस्तानला शेवटचा सामना सिडनीमध्ये खेळायचा आहे.
३ जानेवारीपासून हा सामना सुरू होणार असून या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने मोठा निर्णय घेतला आहे. शाहीन शाह आफ्रिदीला पाकिस्तानी संघातून वगळण्यात आले आहे.
सामन्याच्या एक दिवस आधी पाकिस्तानने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले. ज्यामध्ये इमाम उल हक आणि शाहीन आफ्रिदीला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.
पाकिस्तानने शाहीन आफ्रिदी आणि इमाम उल हक यांना प्लेईंग इलेव्हनमधून का वगळले हा मोठा प्रश्न आहे. खराब फॉर्ममुळे इमाम उल हकला संघात स्थान मिळालेले नाही, तर शाहीन आफ्रिदीला विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे.
शान मसूदने सांगितले की, शाहीन आफ्रिदी गेल्या एका वर्षात जास्त खेळला आहे आणि आता त्याला विश्रांतीची गरज आहे. पण इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाहीन आफ्रिदीची कामगिरीही खूपच खराब झाली होती. सिडनी कसोटीत त्याच्या जागी ऑफस्पिनर साजिद खानला संधी देण्यात आली आहे.