बर्लिन : युरोपातील अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. फ्रान्स, पोर्तुगाल आणि इटलीनंतर जर्मनीतही आंदोलनादरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी रात्री जर्मनीचे आर्थिक केंद्र मानल्या जाणा-या फ्रँकफर्टमध्ये आंदोलकांनी तोडफोड आणि दुकाने लुटली. बर्लिन, कोलोन आणि हॅम्बर्गसह अनेक शहरांमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. यात अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले असून शेकडो आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जर्मनीतील या आंदोलनाचे आयोजन जेन झी रिग्लेट या मोहिमेअंतर्गत करण्यात आले होते. या जर्मन नावाचा अर्थ जेन ने आता सूत्रे हाती घेतली आहेत, असा होतो. शाळांना मिळणारा अपुरा निधी, वाढता महागाईचा भार, सरकारी खर्चात होणारी कपात आणि अनिवार्य लष्करी सेवेला विरोध अशा विविध मागण्यांसाठी तरुण रस्त्यावर उतरले आहेत. जनरेशन झी रेग्युलेट या संघटनेच्या प्रवक्त्या लीना फ्रेडरिक यांनी सांगितले की, हे आंदोलन शांतता आणि स्वातंत्र्यांसाठी होते; युद्ध आणि जबरदस्तीच्या विरोधात होते. आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेला अधिक आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे. अनिवार्य लष्करी सेवेला संघटनेचा विरोध असून जबाबदा-यांचे वाटप न्याय्य पद्धतीने व्हावे अशी त्यांची मागणी आहे.
फ्रान्समध्येही ३.२० लाखांहून अधिक नागरिक रस्त्यावर
तिकडे फ्रान्समध्येही तरुणांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. शनिवारी फ्रान्समध्ये ३ लाख २० हजारांहून अधिक नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. वाढती महागाई आणि सरकारी सेवांची ढासळती गुणवत्ता, विशेषत: शिक्षण व्यवस्थेतील समस्यांविरोधात आंदोलकांनी आवाज उठवला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये हजारो पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. काही शहरांमध्ये पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. फ्रान्सच्या गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, शनिवारी झालेल्या आंदोलनादरम्यान ७७० हून अधिक जणांना अटक करण्यात आली. मागील आठवड्यात झालेल्या आंदोलनांच्या तुलनेत ही संख्या जवळपास निम्मी होती.
इटली आणि पोर्तुगालमध्येही आंदोलनाचा भडका
युरोपातील इतर देशांमध्येही आंदोलनांची तीव्रता वाढताना दिसत आहे. इटलीची राजधानी रोम आणि ट्यूरिन शहरात आंदोलक व पोलिसांमध्ये संघर्ष झाला. पोर्तुगालमध्ये पोलिसांनी नव्याने उभारलेला तळ हटवण्याची कारवाई केली. घरभाड्याच्या वाढत्या खर्चाविरोधात हजारो लोकांनी मोर्चा काढल्यानंतर हा तळ उभारण्यात आला होता. आंदोलकांच्या मते, देशातील घरांच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ आणि परवडणा-या घरांची कमतरता यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. गेल्या दहा वर्षांत पोर्तुगालमधील घरांच्या किमती दुपटीहून अधिक वाढल्या आहेत. फ्रान्स, बेल्जियम, आयर्लंड, स्पेन, पोर्तुगाल, इटली, ग्रीस, सर्बिया आणि अल्बानियासह अनेक युरोपीय देशांमध्ये अलीकडच्या काळात तरुणांनी आंदोलन केले आहे. प्रत्येक देशातील मागण्या वेगवेगळ्या असल्या तरी वाढता जीवनावश्यक खर्च, घरांच्या वाढलेल्या किमती, शिक्षणाचा दर्जा आणि सरकारी सेवांमधील कपात हे मुद्दे आंदोलनांच्या केंद्रस्थानी आहेत.
















