पुणे : प्रतिनिधी
कृषि विभागातील २०२१ तसेच २०२२ मधील निवड झालेल्या मुलांची शिफारस होऊनही त्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. तसेच २०२३ आणि २०२४ मधील आयोगाच्या जाहिरातीमध्ये कृषि पदवीधरांसाठी एकही जागा नव्हती. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्री लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील अहिल्या लायब्ररीसमोर एकत्रित येत आंदोलन केले. बुधवारी सकाळीसुद्धा हजारो विद्यार्थी पुन्हा लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर जमा झाले होते.
दरम्यान, निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जात नाही. तसेच नवीन पदांची जाहिरात प्रसिद्ध केली जात नाही. त्यामुळे अभ्यास करणा-या कृषि पदवीधरांची कोंडी झाली आहे. वय वाढत चालले असून आमच्या भविष्याचे काय? असा प्रश्न कृषि पदवीधर विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यामुळे कृषि विभागाने नुकतीच २५८ पदे एमपीएससीकडे भरतीसाठी वर्ग केली आहेत. ही पदे २०२४ च्या जाहिरातीत समाविष्ट करावीत आणि परीक्षा घ्यावी. त्यामुळे कृषिप्रधान देशात कृषिपुत्रांना न्याय मिळेल, अशी भावना आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.