चेन्नई: तमिळनाडूच्या राजकारणात सध्या ऐतिहासिक उलथापालथ पाहायला मिळत आहे. ‘थलापती’ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे सरकार राज्यात स्थापन झाले असून विजय यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली आहे. मात्र, खऱ्या परीक्षेची वेळ अजून बाकी आहे. विधानसभेत होणाऱ्या ‘फ्लोअर टेस्ट’ (बहुमत चाचणी) पूर्वी विजय यांच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या AIADMK ने विजय सरकारला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
AIADMK चे ज्येष्ठ नेते सी.व्ही. षण्मुगम यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. “आमचा लढा गेल्या ५३ वर्षांपासून DMK विरुद्ध आहे. जर आम्ही DMK सोबत हातमिळवणी केली असती, तर आमचे अस्तित्व संपले असते,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. पक्षाच्या अस्तित्वासाठी आणि कार्यकर्त्यांच्या भविष्यासाठी हा निर्णय घेतला आहे. AIADMK ला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे, त्यासाठी सामूहिक जबाबदारी स्वीकारून पक्षाला पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. विधानसभेत एस.पी. वेलुमणी हे AIADMK चे नेते म्हणून काम पाहतील, तर सी. विजयभास्कर यांची प्रतोद (Whip) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तमिळनाडू विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २३४ असून बहुमतासाठी ११८ आमदारांची आवश्यकता आहे. विजय यांच्याकडे सध्या खालीलप्रमाणे पाठबळ आहे. आता AIADMK च्या पाठिंब्यामुळे विजय यांचे पारडे जड झाले आहे. जर ऐनवेळी VCK किंवा IUML सारख्या छोट्या पक्षांनी पाठिंबा काढला, तरीही AIADMK च्या मदतीने विजय सहजपणे बहुमत चाचणी उत्तीर्ण होऊ शकतील.
विदुथलाई चिरुथिगल काची (VCK) आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) यांनी विजय यांना पाठिंबा दिला असला, तरी त्यांनी DMK सोबतचे आपले नाते तोडलेले नाही. राज्यात घटनात्मक संकट ओढवू नये आणि राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये, यासाठीच आपण विजय यांना पाठिंबा देत असल्याचे VCK ने स्पष्ट केले आहे. राज्यपाल आर.एन. रवी यांच्यासमोर विजय यांनी आधीच आमदारांची यादी सादर केली आहे. मात्र, नियमानुसार त्यांना विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे लागेल. AIADMK च्या या अनपेक्षित समर्थनामुळे विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग आता अधिक सुकर झाला आहे, तर दुसरीकडे DMK राज्यात एकाकी पडताना दिसत आहे.
















