नवी दिल्ली : सलग दोन दिवसांत एअर इंडियाच्या दोन वेगवेगळ्या विमानांमध्ये अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शेकडो प्रवाशांच्या जीवात जीव आला होता. दिल्लीहून बंगळुरूकडे जाणारे एक विमान तांत्रिक समस्येमुळे तातडीने भोपाळकडे वळवावे लागले, तर दुसरीकडे सॅन फ्रान्सिस्कोहून दिल्लीला येणारे आंतरराष्ट्रीय विमान थेट मंगोलियाची राजधानी उलानबातारमध्ये उतरवण्यात आले. मात्र, दोन्ही ठिकाणी एअरलाइनच्या वैमानिक आणि कर्मचा-यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.
सोमवारी सायंकाळी दिल्लीहून बंंगळुरूकडे उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या एआय२४८७ या विमानाने तांत्रिक बिघाडामुळे अचानक डगमगण्यास सुरुवात केली. क्रू सदस्यांनी कोणतीही जोखीम न घेता तातडीने विमान भोपाळ विमानतळाकडे वळवण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हे विमान भोपाळ विमानतळावर सुरक्षित उतरले. विमानातील १५० हून अधिक प्रवासी सुखरूप असून, त्यांची लगेच व्यवस्था करण्यात आली. एअरलाइनच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली की सुरक्षा हा आमच्यासाठी सर्वोच्च विषय आहे. विमानाची कसून तपासणी सुरू असून, प्रवाशांसाठी खानपान आणि दुस-या विमानाची व्यवस्था केली जात आहे.

