मुंबई : प्रतिनिधी
दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण शहर हादरले होते. या घटनेतील सर्वांत मोठी बाब म्हणजे डोकाडिया कुटुंबियांची मुलगी आयेशा हिचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये आयेशा ७० टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.
पायधुरी परिसरात राहणा-या अब्दुल्ला डोकाडिया (वय ४५), त्यांची पत्नी नसरीन (वय ४०) आणि त्यांच्या दोन मुली आयेशा (वय १६) व झैनब (वय १३) यांच्या घरी २५ एप्रिलच्या रात्री स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अनेक मित्र आणि नातेवाईक सहभागी झाले होते.
बिर्याणीसह विविध पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर सर्व पाहुणे आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर २६ एप्रिलच्या पहाटे १ वाजेच्या सुमारास कुटुंबातील सदस्यांनी फ्रिजमध्ये ठेवलेले कलिंगड खाल्ले. ते खाल्ल्यानंतर काही वेळातच चौघांनाही उलट्या आणि तीव्र जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांची प्रकृती बिघडल्याने उपचारादरम्यान या चारही जणांचा मृत्यू झाला. हे कुटुंब पायधुनी येथील त्यांच्या काकांच्या घरात गेल्या दोन वर्षांपासून वास्तव्यास होते.
डोकाडिया कुटुंबियांची माठी मुलगी आयेशा हिचा दहावीचा निकाल हाती आला आहे. आयेशा ही अभ्यासात अत्यंत हुशार होती आणि खेळत असतानाही तिचे अभ्यासाकडे पूर्ण लक्ष असे, असे तिच्या शेजा-यांनी सांगितले. यशाचा हा आनंद साजरा करण्यासाठी ती आज जिवंत नसल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरुवातीला ही घटना अन्नातून झालेल्या विषबाधेचा एक दुर्दैवी प्रकार वाटत होती. मात्र, आता फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाने या प्रकरणाला एक धक्कादायक वळण दिले आहे. यावेळी मृतांच्या अवयवांच्या नमुन्यांत आणि त्यांनी खाल्लेल्या कलिंगडमध्ये झिंक फॉस्फाईड या उंदीर मारण्याच्या विषाचे अंश आढळून आले आहेत. यामुळे ही घटना केवळ अपघात नसून घातपात किंवा सामूहिक आत्महत्येचा प्रकार असावा, असा संशय बळावला आहे.
















