मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार व दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या विमानाला झालेल्या अपघाताबद्दल अनेन प्रश्न उपस्थित करत घातपाची शक्यता व्यक्त केली. विमानाची तांत्रिक स्थिती, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, सीसीटिव्ही फुटेज यातून पुढे आलेल्या माहितीकडे लक्ष वेधताना याची भारतीय एजन्सीबरेबारच फ्रान्समधील बीईए आणि अमेरिकेतील एएआयबी या आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून चौकशी करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक जणांकडून शंका व्यक्त होत असताना खुद्द पवार कुटुंबातील आ. रोहित पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषद घेऊन अजितदादाच्या विमान अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीबद्दल प्रश्न उपस्थित केले. युरोपियन एजन्सींनी या कंपनीचे परवाने रद्द केले होते. तरीही या कंपनीची विमान भारतात उडत आहेत. अजित पवारांचा मृत्यू होऊनही या कंपनीवर अद्याप बंदी का घातली जात नाही ? असा सवाल त्यांनी केला.
बारामतीला अद्ययावत आयएलएस सिस्टीम नसल्याने अपघात झाल्याचे काही लोक सांगतायत. या विमानतळावर यापूर्वी अनेक विमाने, व्हीआयपी, उद्योगपती उतरले आहेत. या विमानाचा मुंबई विमान तळावर अपघात झाला होता. तिथे तर अद्यावत आयएलएस यंत्रणा होती, तरीही अपघात झाला होता. त्या अपघाताचा रिपोर्ट अद्याप का आलेला नाही? तो रिपोर्ट दाबला गेला नसता तर कदाचित अजित दादांचा अपघात वाचवता आला असता असेही रोहित पवार म्हणाले. या कंपनीच्या सर्व विमानांचे आणि गेल्या १० दिवसांच्या सीसीटीव्ही फुटेजचे सखोल ऑडीट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. ज्या व्हीएसआर कंपनीचे हे विमान होते त्या कंपनीच्या मालकी हक्काबाबतही त्यांनी सवाल उपस्थित केले. कागदारवर ३ शेअर होल्डर दिसत असले तरी प्रत्यक्षात २७ शेअर होल्डर्स आहेत आणि वेळ पडल्यास ती नावे उघड करावी लागतील असा इशारा त्यांनी दिला.
मोसाद कनेक्शन?
इस्त्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादच्या पुस्तकाचा संदर्भ देत रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. एखाद्या व्यक्तीला मारायचे असेल तर त्याचा चालक किंवा पायलट मारणे हा सोपा मार्ग असतो. त्याप्रमाणे हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. माझा काका आणि राज्याचा मोठा नेता गेला आहे आम्हाला उत्तरे मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे रोहित पवार म्हणाले.
२ दिवस आधी विमान सूरतला जाऊन आले होते
अपघात झालेले विमान २ दिवस आधी सुरतला जाऊन आले होते. कंपनीचे मालक म्हणतात की, हवामानामुळे अपघात झाला असावा. ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हवामान सामान्य असल्याचे दिसते आहे. विमानात यांत्रिक बिघाड झाला असावा असे स्पष्ट दिसत असेल, तर अनेक प्रश्न उपस्थित होतात. विमान उडण्यापूर्वी चेक करण्यात आले होते का? रूटीन मेंटेनस झाला नव्हता का? याची उत्तरे मिळाली पाहिजेत.
अजित पवार यांनी प्लँन का बदलला?
अजित पवार यांचा विमान प्रवास हा पूर्वनियोजीत नव्हता तर तो ऐनवेळी ठरला होता, असा दावाही रोहित पवार यांनी केला. २७ जानेवारीला संध्याकाळी अजित पवार गाडीने पुण्याला निघणार होते. त्यांचा ताफाही तयार होता. मात्र दोन कारणांमुळे त्यांचा प्रवास रद्द झाला पूर्व विदर्भातील एका मोठा नेता दादांना भेटायला येणार होता त्यांना उशीर झाला. तसेच एका फाईलसाठी अजित पवारांना थांबावे लागल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.
काकींची इच्छा नसताना शपथविधीची घाई केली
अजित पवारांच्या पक्षातील काही लोकांना अपघाताबद्दल शंका आहे. त्यांच्याच पक्षातील अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे. मात्र दादांच्या जवळ असणारे जबाबदार नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ या नेत्यांना असे प्रश्न का पडले नाहीत ? त्यांनी चौकशीची मागणी का केली नाही? या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, त्या सर्व नेत्यांना आपली सत्ता शाबूत राहण्यासाठी हे प्रश्न महत्वाचे वाटत नसतील. काकींची (सुनेत्रा पवार) इच्छा नसताना शपथविधीची घाई केली गेली. आमचे म्हणाल तर काकांच्या बाबतीत काय घडले हे कळले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. हीच गोष्ट काकींसाठी महत्वाची आहे. पार्थ आणि जयला ही महत्वाची आहे, मात्र त्या नेत्यांना काय महत्वाचे वाटते हे लोकांनी गेल्या १३ दिवसांत बघितले आहे, असे उत्तर रोहित पवार यांनी दिले.
रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न
१ दादांचा दौरा बदलणे, विमानाची वेळ बदलणे, पायलट बदलणे, यामागचे कारण काय?
२ केंद्रीय विमान मंत्रालय अहवाल आणि एटीसी ट्रान्सस्क्रिप्टमधील वेळांमध्ये विसंगती का?
३ दृश्यमानता कमी होती तर लँड का केले?
४ विमानाचा आवाज वेगळा का येत होता? ट्रान्सपॉन्डर बंद होता की बंद केला होता
५ पायलट सुमित कपूरचा ट्रॅक रेकॉर्ड वाईट होता दारू प्यायल्याबद्दल त्याला तीन वर्षे निलंबीत केले होते
६ पायलटवर कुणाचा दबाव होता ? त्याने अवघड रनवेची निवड का केली?
७ मृत्यू समोर असतानाही मुख्य पायलट गप्प होता याचा अर्थ काय घायचा?
८ विमान क्रॅश करायचीच मानसिकता होती?
९ फॉरेन्सिकची टीम उशिरा का आली?

