मुंबई : गेल्या काही दिवसांत अजित पवार यांची बदललेली भाषा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती. बारामती लोकसभेची लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा चंग बांधलेल्या अजित पवार यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपल्या घरातील लोकांनाच अंगावर घेतले होते. परंतु, अलीकडच्या काळात अजित पवार यांची शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविषयी भाषा कमालीची मवाळ झाली आहे.
एवढेच नव्हे तर अजित पवार यांना आपल्या चुकांची उपरतीही झाली आहे. त्यामुळे अजित पवार पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत का, अशी कुजबुज सुरु झाली होती. मात्र, शरद पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने अजित पवार यांचे परतीचे सर्व दोर कापले गेले असल्याचे वक्तव्य केले आहे. शरद पवार गटातील नेत्याने अजितदादांविषयी केलेल्या या वक्तव्यावरुन सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शरद पवार गटातील या नेत्याने म्हटले की, अजित पवार यांना आता शरद पवार गटात येण्यास एन्ट्री नाही. विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात शरद पवार गटाचाच उमेदवार विजयी होईल. अजित पवार यांना आता शरद पवार गटात स्थान नाही, असे या नेत्याने म्हटले. त्यामुळे अजित पवार यांचे घरवापसीचे सर्व दोर कापले गेल्याचे तुर्तास दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या मनातील घराण्याविषयीची माया पुन्हा जागृत झाली होती. मी राजकारण घरापर्यंत न्यायला नव्हते पाहिजे. मी माझ्या पत्नीला बहिणीवरोधात रिंगणात उतरवून चूक केली, अशी कबुली अजित पवार यांनी दिली होती. यानंतर अनेक सभा आणि कार्यक्रमांमध्ये अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविषयी भावनिक उद्गारही काढले होते. त्यामुळे अजित पवार हे पुन्हा माघारी परतण्याच्या तयारीत आहेत का, अशा चर्चेला ऊत आला होता. अजित पवार त्याचदृष्टीने भावनिक वक्तव्ये करुन पायाभरणी करत आहेत का, अशा शंका निर्माण केल्या जात होत्या. मात्र, शरद पवार गटातील ज्येष्ठ नेत्याने आता अजितदादांना आमच्या पक्षात स्थान नाही, असे स्पष्ट सांगून सर्व चर्चांना तुर्तास पूर्णविराम दिला आहे.