बारामती : महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करतील आणि लवकरच निर्णय जाहीर होईल असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले. बारामती येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागतील. यासंदर्भात महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करतील. लवकरच निर्णय जाहीर होईल.
‘उद्धव ठाकरेंची मुंबईत मोठी ताकत आहे. त्यांना विश्वासात घेऊन निवडणुकीला सामोरे जावे लागेल. असेही शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाला अधिसूचना जारी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, तीन महिन्यांच्या आत निवडणुका घेण्यासही सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे निवडणूक प्रक्रियेची चर्चा असताना दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेत राजकीय पक्ष आघाडीत लढणार की स्वतंत्र? यासंदर्भात सामान्य नागरिकांप्रमाणेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता आहे. याबाबत शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.
हिंदीची सक्ती नको; पण विरोधही नको
पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीबाबत शरद पवार म्हणाले,’ हिंदीची सक्ती नको; पण विरोधही नको. देशातील ६० टक्के लोक हिंदी बोलतात, त्यामुळे सक्तीची गरज नाही.’
रात्री बारा वाजता बँक उघडून सेवा
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार म्हणाले लोकसभा निवडणुकीवेळी रात्री बारा वाजता बँक उघडून सेवा दिली गेली. आता पुन्हा तशीच परिस्थिती आहे. ज्यांच्या हातात कारभार आहे, ते ठरवतील असे सांगत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली.