नवी दिल्ली : अॅमेझॉनने बुधवारी २५० कर्मचा-यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. कंपनीच्या डिव्हाइसेस विभागातील कर्मचा-यांवर या कपातीचा परिणाम झाला असून यामध्ये प्रामुख्याने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रातील कर्मचा-यांचा समावेश आहे. किंडल ई-रीडर आणि इको स्मार्ट स्पीकर यांसारख्या उत्पादनांची जबाबदारी या विभागाकडे आहे.
अॅमेझॉनने प्रभावित कर्मचा-यांना पहाटे ई-मेल आणि टेक्स्ट मेसेज पाठवून नोकरी कपातीची माहिती दिली. कंपनीच्या उपाध्यक्ष चेरी रॉबिन्सन यांनी पाठवलेल्या ई-मेलमध्ये कंपनीच्या संघटनात्मक रचनेचा सखोल आढावा घेतल्यानंतर काही पदे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. यापूर्वी मेटा आणि ओरॅकल यांसारख्या कंपन्यांनीही कर्मचा-यांना अशाच प्रकारे ई-मेलद्वारे कपातीची माहिती दिली होती.
अॅमेझॉननेही कर्मचारी कपातीला दुजोरा दिला आहे. आम्ही काही मोजक्या पदांमध्ये कपात करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. या निर्णयामुळे अॅमेझॉनला कामकाज अधिक कार्यक्षम करण्यास आणि उत्पादनविषयक नियोजनाशी सुसंगत राहण्यास मदत होईल. दरम्यान, या निर्णयाच्या एक दिवस आधी अॅमेझॉनने आपल्या अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी सप्टेंबरमध्ये जारी केलेले एक निवेदन प्रसिद्ध केले होते. एआयच्या युगात सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची भूमिका कशी बदलत आहे, यावर यात भाष्य करण्यात आले होते. आपल्या सर्वांना हा बदल स्वीकारून नवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळ द्यावा लागेल; अन्यथा आपण मागे पडण्याचा धोका आहे, असे या निवेदनात म्हटले होते. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या कामकाजात एआयची भूमिका मध्यवर्ती असेल असेही त्यात नमूद करण्यात आले होते.
कंपनीने तयार केली उपकरणे
विशेष म्हणजे, कर्मचारी कपातीची घोषणा झाली त्याच दिवशी अॅमेझॉनने अलेक्सा तंत्रज्ञानावर आधारित पाच नवीन उपकरणे सादर केली. यामध्ये नव्या रचनेतील इको शो १६ स्मार्ट डिस्प्ले, अलेक्सा फोटो फ्रेम आणि इको टाइम बेडसाइड क्लॉक यांचा समावेश आहे. ही उपकरणे कंपनीच्या डिव्हाइसेस विभागाने विकसित केली आहेत.
‘एआय’मध्ये अब्जावधींची गुंतवणूक
अॅमेझॉनने याच महिन्याच्या सुरुवातीला आपल्या मुख्य रिटेल विभागातील सुमारे एक हजार कर्मचा-यांना कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी जानेवारीमध्ये कंपनीने १६ हजार कर्मचा-यांच्या कपातीची घोषणा केली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही कंपनीने १४ हजार कर्मचा-यांना कामावरून कमी केले होते. एकीकडे कर्मचारी कपात सुरू असताना दुसरीकडे अॅमेझॉन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. कंपनी यंदा एआय क्षेत्रात तब्बल २२० अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.
















