मुंबई : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ची सत्ता काबीज करण्यासाठी सहकार कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार राज्यातील ज्या सहकारी संस्थांची वार्षिक उलाढाल ५०० कोटींहून अधिक आहे, अशा संस्थांच्या समित्यांवर सरकारकडून नामनिर्देशित पाच सदस्यांची नियुक्ती केली जाईल. या पाचपैकी चार संचालकांना मतदानाचा अधिकार असेल. महायुती सरकारने हा निर्णय घेऊन काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का दिला असून गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० मधील कलम ७३अअअ (२) च्या परंतुकामध्ये नवीन परंतुक समाविष्ट करण्यास मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. त्यानुसार एक सहाय्यक निबंधकाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी आणि संस्थेच्या कार्याचा अनुभव असलेल्या चार व्यक्तींची संचालक म्हणून नियुक्ती होणार आहे. शासकीय अधिका-याला मताचा अधिकार नसेल. मात्र, इतर चौघांना संचालक मंडळात मताचा अधिकार असणार आहे. पण हे संचालक संस्थेच्या पदाधिकारी पदाच्या निवडणुकीस पात्र राहणार नाहीत.
सहकार कायद्यात करण्यात येणा-या या महत्वपूर्ण दुरुस्तीमधून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना वगळण्यात आले आहे. राज्यपालांच्या मान्यतेने यासंदर्भात अधिसूचना लवकरच जारी केली जाईल. या निर्णयाने गोकुळची सत्तासमीकरणे बदलणार असून, संचालक पदाच्या निवडणुकीत झालेल्या उमेदवारांपैकी चार जणांना पुन्हा मागच्या दाराने गोकुळची दारे उघडली जाणार आहेत. गोकुळच्या संचालक पदाची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली. २५ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या गटाचे १३ तर महायुतीचे १२ संचालक निवडून आले. गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची २९ ऑक्टोबरला बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, गणपूर्ती अभावी ही बैठक होऊ शकली नाही. महायुतीच्या संचालकांनी या बैठकीकडे पाठ फिरवली होती. बैठकीच्या गणपूर्तीसाठी १४ सदस्यांची उपस्थिती अनिवार्य असते.
महायुतीचे संचालक बैठकीला गैरहजर राहून अध्यक्ष निवडणुकीत बाधा आणत असल्याने सतेज पाटील यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घाईघाईने सहकार कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला.
काय आहे मंत्रिमंडळाचा निर्णय
शासकीय भागभांडवल, कर्ज हमी, निधी, शासकीय जमीन किंवा रोख अथवा इतर स्वरूपात शासनाचे अर्थसहाय्य असलेल्या व ५०० कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल असणा-या सहकारी संघांच्या संचालक मंडळामध्ये शासन नामनिर्देशित पाच सदस्यांचा समावेश करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०च्या कलम ७३ अअअ (२) मध्ये सुधारणा करण्यास व त्याबाबत अध्यादेश काढण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या नामनिर्देशित पाच सदस्यांमध्ये एक सहाय्यक निबंधकाच्या दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी आणि अशा संस्थांच्या कार्याचा अनुभव असलेल्या चार व्यक्तींचा समावेश राहणार आहे. नामनिर्देशित शासकीय अधिकारÞी सदस्याला मताचा अधिकार नसेल. इतर चार सदस्यांना संचालक मंडळात मताचा अधिकार असेल पण ते या संस्थेच्या पदाधिकारी पदाच्या निवडणुकीस पात्र राहणार नाहीत. अधिनियमातील ही सुधारणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना लागू राहणार नाही. कायद्यातील सध्याच्या तरतुदींनुसार, सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावर संस्थेने स्वीकृत केलेले २ संचालक आणि २ शासन नामनिर्देशित संचालक नियुक्त करता येतात.
सतेज पाटील संतप्त
गोकुळ दूध संघावर ४ स्वीकृत संचालक नेमण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ही लोकशाहीची गळचेपी आहे. साडेपाच लाख शेतक-यांनी आमच्या बाजूने कौल दिलेला आहे. लोकांचा कौल नाकारत असाल, तर रस्त्यावर उतरायची तयारी आम्ही ठेवली असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. सत्तेचे सूत्र असेच राहणार नाही, २०२९ ला ते बदलणार आहे. त्यावेळी सुद्धा आम्ही सगळे लक्षात ठेऊ, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला.
निर्णयावर विरोधकांच्या प्रतिक्रिया
साम, दाम, दंड, भेद वापरूनही कोल्हापूरच्या स्वाभिमानी शेतक-यांनी गोकुळ दूध संघ हातात दिला नाही. निवडणुकीतील हा पराभव महायुतीला एवढा जिव्हारी लागला आहे की, आता थेट सहकार कायद्यातच छेडछाड करून मागच्या दाराने ४ संचालक घुसवून गोकुळ ताब्यात घेण्याचा लाचार प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. ही लोकशाही नाही, तर गुंडगिरी आहे.
विजय वडेट्टीवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते
गोकुळ ताब्यात घेण्यासाठी पाच शासनमान्य सदस्यांची नियुक्ती करून त्यातील चौघांना मतदानाचा अधिकार देण्याचा महायुती सरकारचा निर्णय हा संविधान आणि लोकशाही धुडकावून गोकुळवर कब्जा मिळवण्याचा डाव आहे.
हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
‘गोकुळ’मध्ये चार शासन नियुक्त संचालक नेमून त्यांना मतांचा अधिकार देणे ही लोकशाहीची हत्या आहे. मंत्रिमंडळाचा हा निर्णय सहकार क्षेत्रासाठी काळा कायदा असून या तीव्र निषेध करते.
यशोमती ठाकूर, माजी मंत्री
गोकुळ निवडणुकीत सत्ताधा-यांची अक्षरश: अब्रू गेली आहे.अवघा सत्ताधारी वर्ग एकत्रितपणे निवडणूक लढवत असताना देखील बंटी पाटलांनी जनमताच्या पाठिंब्यावर विजयश्री खेचून आणली. ही बाब सत्ताधारी गटाला अजून पचलेली दिसत नाही. आज त्यांनी गोकुळवर चार शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक केली आहे. आता याबाबत समस्त कोल्हापूरकरांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
जितेंद्र आव्हाड नेते, राष्ट्रवादी शरद पवार गट
आज ‘गोकुळ’ दूध संघाच्या स्वायत्ततेवर घाला घातला जात आहे. ५ हजार ४०० दूध संस्था आणि साडेपाच लाख शेतक-यांच्या लोकशाही कौलाचा आदर राखला गेलाच पाहिजे. केवळ संघ ताब्यात ठेवण्याच्या धावपळीतून किंवा राजकीय कुरघोडीतून शासन नियुक्त संचालकांचा हस्तक्षेप झाल्यास या नावारूपाला आलेल्या संस्था मोडकळीस येतील.
रवींद्र धंगेकर माजी आमदार, शिवसेना शिंदे गट
















