तेहरान : इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी अमेरिकेवर युद्धविराम मोडल्याचा आरोप केला. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की, अमेरिका तणाव कमी करण्याऐवजी आपल्या लष्करी कारवाईने संपूर्ण प्रदेशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेने सीरिक प्रदेश आणि केशम बेटावरील इराणच्या किनारी रडार आणि पाळत ठेवणा-या केंद्रांवर हल्ला केला, जो युद्धविरामाचे स्पष्ट उल्लंघन आहे. इराणने म्हटले आहे की, या हल्ल्यांनंतर जी काही परिस्थिती निर्माण होईल आणि त्याचे जे काही परिणाम होतील, त्याची संपूर्ण जबाबदारी अमेरिकेची असेल. लेबनॉनमध्ये मृतांचा आकडा ३,५९३ वर पोहोचला असून २ मार्चपासून सुरू असलेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ३,५९३ लोकांचा मृत्यू झाला असून १०,९९० लोक जखमी झाले आहेत. गेल्या २४ तासांत ३५ लोकांचा बळी गेला आणि १२० लोक जखमी झाले. शनिवारी झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये लेबनानी लष्कराच्या एका ब्रिगेडियर जनरलसह १० लोकांचा मृत्यू झाला.
हल्ल्यांनंतर अनेक भागांतील लोकांना घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले. अमेरिकेने होर्मुजच्या दिशेने जात असलेले ४ इराणी ड्रोन पाडल्याचा आणि केशम बेटावरील रडार साइट्सवर हल्ला केल्याचा दावा केला. प्रत्युत्तरादाखल, इराणने कुवेत आणि बहरीनच्या दिशेने ७ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, जी रोखल्याचा दावा करण्यात आला.
तेहरानने आरोप केला की अमेरिकेने सीरिक आणि केशम बेटावरील किनारी रडार ठिकाणांवर हल्ला करून युद्धविरामाचे उल्लंघन केले. इराणने म्हटले की यानंतर निर्माण होणा-या परिस्थितीची जबाबदारी अमेरिकेची असेल.
इराण-अमेरिका करार २४ अब्ज डॉलर्सवर
संभाव्य शांतता करार इराणच्या २४ अब्ज डॉलर (सुमारे २.२९ लाख कोटी) गोठवलेल्या मालमत्ता जारी करण्यावर अवलंबून आहे. इराणला करारासोबतच १२ अब्ज डॉलर जारी करायचे आहेत, तर अमेरिका यावर अजून सहमत नाही.
















