मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन यांना मिळालेल्या बॉम्बच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. दर रविवारी आपल्या जलसा या निवासस्थानाबाहेर जमणा-या चाहत्यांना भेटण्याची परंपरा जपत अमिताभ बच्चन रविवारी पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आले. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव या वेळी ते चहूबाजूंनी वेढलेल्या एका बुलेटप्रूफ काचेच्या केबिनमधून चाहत्यांची भेट घेताना दिसले. केबिनमधूनच त्यांनी बाहेर जमलेल्या चाहत्यांकडे हात हलवून आणि हात जोडून नमस्कार केला.
अलिकडेच अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. या घटनेनंतर मुंबई पोलिस प्रशासन तातडीने सतर्क झाले असून बंगल्याच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली. रविवारी संडे दर्शन दरम्यान पोलिस कर्मचा-यांनी बॅरिकेड्सजवळ तैनात राहून जमावावर आणि संपूर्ण परिसरावर बारकाईने लक्ष ठेवले.
डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला, तरीही चाहत्यांना भेटले
अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच लिहिलेल्या ब्लॉगमध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा आणि प्रकृृतीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावरही त्यांनी आरोग्याविषयी अपडेट शेअर केले आहेत. तरीसुद्धा, प्रकृती ठीक नसताना आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न असतानाही त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही संडे दर्शनची परंपरा मोडली नाही.
महापौर कार्यालयाला धमकीचा ईमेल
मिळालेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या कार्यालयाला एक धमकीचा ईमेल आला. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील जलसा बंगल्यासह गायक-अभिनेता दिलजीत दोसांज यांच्या मुंबईतील कॉन्सर्टला आणि काही शाळांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली. ईमेलमध्ये ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान जलसा बंगल्याला लक्ष्य केले जाईल, असे नमूद करण्यात आले. या धमकीनंतर पोलिसांनी त्वरित पावले उचलत सुरक्षेची कडेकोट व्यवस्था केली आहे.
















