16.9 C
Latur
Sunday, November 9, 2025
Homeपरभणीआईचा छळ पाहून संतप्त मुलाकडून दारुड्या पित्याची हत्या

आईचा छळ पाहून संतप्त मुलाकडून दारुड्या पित्याची हत्या

परभणी जिल्ह्यातील घटना

गंगाखेड : दारूच्या व्यसनाने एका कुटुंबाचा संसार उध्वस्त केला, तर १६ वर्षांच्या मुलाच्या हातून गंभीर गुन्हा घडला. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील इसाद येथे मंगळवारी मध्यरात्री उशिरा आईला सतत मारहाण करणा-या वडिलांचा, त्यांच्याच मुलाने पोटात चाकू खुपसून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आईला सातत्याने होणा-या त्रासाने संतप्त झालेल्या या अल्पवयीन मुलाच्या कृत्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

इसाद येथील रहिवासी गणेश अंकुशराव भोसले( ४०) यांना दारूचे व्यसन होते. नशेत ते दररोज पत्नीस (मुलाच्या आईला) मारहाण करत असत. वडिलांकडून आईचा सातत्याने होणारा छळ पाहून त्यांचा १६ वर्षीय मुलगा आतून संतप्त होता. दरम्यान, मंगळवारी रात्री १२ ते १२:३० वाजण्याच्या सुमारास गणेश भोसले यांनी पुन्हा पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. आईला रोजच होणारा हा त्रास पाहून मुलाचा संताप अनावर झाला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता घरातील चाकू घेतला आणि वडिलांच्या पोटात वार केले. गंभीर जखमी झाल्याने गणेश भोसले यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांकडून तातडीने तपास सुरू
बुधवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच गंगाखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शिरतोडे आणि पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. वडिलांकडून सातत्याने आईचा छळ पाहून कंटाळून मुलाने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, मुलावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR